लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : विदर्भातील ताडोबा जंगल परिसरात कोलबेड मिथेनचा (सीबीएम) मोठा साठा आहे. त्यामुळे ताडोबामधूम सीबीएम काढण्याचा विचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली. यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी गरजेची नसल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही गडकरींनी सांगितले.

नागपूरमध्ये सुरू असलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवाच्यानिमित्त आयोजित परिचर्चेत ते बोलत होते. ‘विदर्भाच्या गर्भात नैसर्गिक वायुचे साठे मोठ्या प्रमाणात आहे. सीबीएम काढून त्यापासून सीएनजीची निर्मिती केली जाऊ शकते. यामुळे देशात डिझेलचा हद्दपार करून सीएनजी,इथॅनॉल आधारित इंधनाचा वापर वाढेल’, असे नितीन गडकरी म्हणाले.

आणखी वाचा-नागपूर : महामार्गावर निष्काळजीपणे उभे केलेल्या ट्रकांना धडकून दोन ठार

‘भारताला ऊर्जेच्याबाबतीत आयात करणारा नको तर निर्यात करणारा देश बनवायचा आहे. देशात बायो एविएशन इंधन, कोल गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे ३०० उत्पादके तयार केली जाऊ शकतात. भारताला मिथॅनॉल अर्थव्यवस्था म्हणून उभारायचे आहे’, असेही गडकरी यांनी सांगितले. यावेळी पेट्रोलियम मंत्रालय आणि वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोलबेड मिथेन म्हणजे काय?

कोलबेड मिथेन (सीबीएम) हा अपारंपारिक नैसर्गिक वायुचा स्त्रोत आहे. कोळशावर एका विशिष्ट दबावाखाली प्रक्रिया केल्यानंतर सीबीएमचे उत्सर्जन होते. जगातील कोळशा खाणीच्याबाबतीत भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो. त्यामुळे भारताच्या विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सीबीएमचे साठे आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या ३३१ वर्ग किमी भागात ३७ बिलियन क्युबिक मीटर तर गडचिरोलीच्या ७०९ वर्ग किमी परिसरात ४७ बिलियन क्युबिक मीटर सीबीएम साठा असल्याची माहिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consideration of extracting coalbed methane from tadoba forest says union minister nitin gadkari tpd 96 mrj
Show comments