अकोला : सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वेने अनेक मार्गांवर नवीन गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते गया दरम्यान नवीन रेल्वे धावेल. त्यामुळे सणासुदीच्या गर्दीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
गाडी क्रमांक २२३५७ लोकमान्य टिळक टर्मिनस ते गया साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस २५ ऑक्टोबरपासून दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १३.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी गया येथे २२.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक २२३५८ गया ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस २३ ऑक्टोबरपासून दर बुधवारी गया येथून १९:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ०५:५० वाजता पोहोचणार आहे.
हे ही वाचा…एसटी महामंडळात ११ हजार कोटींचा गैरव्यवहाराचा संशय… ७० हजार कोटींच्या करारावर…
या गाडीला कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, हटिया, रांची, मेरसा, बरकाकाना, हजारीबाग टाउन आणि कोडरमा येथे थांबा राहणार आहे. एक प्रथम वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित (इकॉनॉमी क्लास) , तीन तृतीय वातानुकूलित, सहा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक पँट्रीकार, एक जनरेटर व्हॅन, एक एसएलआर असे एकूण २२ एलएचबी कोचची गाडीची संरचना राहील. या नवीन गाडीचे आरक्षण १९ ऑक्टोबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी
आगामी काळात वर्षातील सर्वात मोठा दिवाळीचा सण आहे. दिवाळीचा सण आपल्या कुटुंबासह घरी साजरा करण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने इतर गावांमध्ये राहणारे दिवाळीला आपले घर गाठण्यासाठी धडपड करीत असतात. या काळात रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी उसळत असल्याने अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
हे ही वाचा…विभागीय शिक्षण मंडळावर अशासकीय सदस्य नियुक्त
बडनेरा ते अमरावती शटल सेवा रद्द
बडनेरा स्थानकावरील प्लेटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ च्या विस्तार कार्यामुळे बडनेरा ते अमरावती दरम्यान चालणाऱ्या शटल सेवा १६ ते २५ ऑक्टोबरदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. एकूण १० दिवस शटल सेवा राहणार नाही. बडनेरा ते अमरावती व अमरावती ते बडनेरा गाडी क्रमांक ०१३७५, ०१३७६, ०१३७७, ०१३७८, ०१३७९ व ०१३८० या धावणार नाहीत. पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होणार असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.