चंद्रपूर : महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी १५ एप्रिलला येणार होत्या. मात्र, त्यांच्या सभेसाठी चंद्रपूर क्लब ग्राऊंड उपलब्ध झाले नाही. कारण निवडणूक प्रचार सुरू झाले तेव्हापासून १७ एप्रिल पर्यंत एका अपक्ष उमेदवाराने हा मैदान आरक्षण करून ठेवले होते. त्यामुळे प्रियंका गांधी यांचा चंद्रपूर दौरा रद्द करावा लागला, असे सांगत यामागे विरोधकाचे षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार शांतपणे सुरू असताना भाजपाकडून आरोप केले जात आहे. भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गडचांदूर व बल्लारपूर येथील सभेत वैयक्तीक आरोप केले. दारू दुकानांचा विषय काढून ” देश विरुद्ध देशी ” असा अपप्रचार करून काँग्रेसच्या उमेदवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, धानोरकर यांचा हा व्यवसाय आहे. त्यांना शासनाकडून परवाना आहे. मग भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दारू निर्मिती कारखान्यावर हे भाजपाचे नेते का बोलत नाहीत, असा प्रश्न धोटे यांनी उपस्थित केले.

हेही वाचा >>> यंदा प्रचारातून कृषी, रोजगार, शिक्षण, महागाई, आरोग्याचे मुद्दे गायब! प्रमुख प्रश्नांना नेत्यांची बगल…

 ‘शिवसेनेचे स्थानिक नेते काँग्रेससोबत’

काँग्रेसच्या प्रचारात स्थानिक पातळीवर घटक पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेतले जात नाही, ते प्रचारात कुठे दिसत नाहीत असा प्रश्न विचारला असता धोटे यांनी शिवसेनेचे काही अंतर्गत प्रश्न होते. त्यामुळे काही दिवस शिवसेनेचे स्थानिक नेते दूर राहीले. मात्र, आता ते सोबत असल्याचा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात सभा पार पडली. या सभेसाठी प्रत्यक्षात झालेला खर्च आणि दाखविण्यात आलेल्या खर्चात मोठी तफावत असल्याचा आरोप धोटे यांनी केला.

 ‘भाजपकडून प्रशासनाचा दुरुपयोग’ भाजपकडून प्रशासनाचा दुरुपयोग केला जात आहे. जिल्ह्यातील प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर नाके उभारण्यात आले आहे. या नाक्यावर केवळ काँग्रेसच्या गाड्या तपासल्या जात आहे. भाजपच्या प्रचार गाड्या व नेत्यांच्या प्रचार गाड्या न तपासता सोडून दिल्या जात आहेत. काँग्रेसला सर्व प्रकारचा अटकाव केला जात आहे, असाही आरोप धोटे यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conspiracy of opposition to stop priyanka gandhi rally in chandrapur says mla subhash dhote rsj 74 zws