लोकसत्ता टीम
अकोला : महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हा एक नवीन कायदा आणण्यासाठी राज्य शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली. या प्रस्तावित कायद्यामुळे सर्वसामान्यांच्या हक्क व अधिकारावर गदा येईल.
लोकशाहीचा गळा घोटून पोलीस राज आणण्याचे सत्ताधाऱ्यांचे षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप वंचित आघाडीच प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाला वंचित आघाडीचा तीव्र विरोध असून याविरोधात जनआंदोलन उभारले जाणार असल्याचे डॉ.पुंडकर यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कष्ट व दूरदृष्टीने निर्माण केलेले संविधान बदलण्याचे षडयंत्र काँग्रेसने सुरू केले. २०१४ नंतर भाजपने त्याला वेग दिला. महाराष्ट्र शासनाने संविधान बदलण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले. संविधानाच्या मूळ तरतुदी १४, १९, २१ मध्ये समता, स्वतंत्र्यता आणि जीवन जगण्याचा अधिकारावर घाला घातला जात आहे.
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हा एक नवीन कायदा आणण्यासाठी राज्य शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यावर ३० मार्चपर्यंत आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या. लोकशाहीमध्ये मतभेद, विचारभन्नता असणे आवश्यक आहे. त्याशिवाय लोकशाही सुदृढ होणार नाही.
सत्ताधारी चुकतात, कुणाच्या अधिकार व हक्कांवर बंधने येत असतील, तर समाजातील विविध संघटन हक्कासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलने करतात. त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपल्या व्यवस्थेत आवश्यक ते बदल करून त्यांना न्याय देण्याची भूमिका कल्याणकारी राज्याची असावी, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवले.
मात्र, प्रस्ताविक कायद्यामध्ये कलम २, ५ आणि ८ अंतर्गत सरकारविरोधात आंदोलने केली, लेखणी चालवली, उणिवा स्पष्ट केल्या तर ते कृत्य बेकायदेशीर ठरवून सरकार कठोर कारवाई करेल. सरकार न सांगता अटक करू शकेल. जामीन नाकारला जाईल. दोन ते सात वर्षांचा तुरुंगवास होईल.
दोन ते तीन लाखाचा दंड देखील होऊ शकतो. सरकार विरोधात बोलता येणार नाही. हक्कासाठी लढता येणार नाही. जो-जो सरकार विरोधात बोलेल, त्याच्या विरोधात सरकार कठोर कारवाई करणार आहे. सरकार पोलीस राज आणण्याचे षडयंत्र रचत आहे, असा गंभीर आरोप डॉ.पुंडकर यांनी केला.
वंचित आघाडी याचा तीव्र निषेध करून याचा संपूर्ण ताकदीने विरोध करणार आहे. विविध स्वयंसेवी संघटना, समुह संघटना, अल्पसंख्याकांच्या संघटना, विवेकी नागरिकांच्या संघटनांना सोबत घेऊन वंचित आघाडी या विधेयकाला तीव्र विरोध करेल. वंचित आघाडी सर्वांशी चर्चा करून या विधेयका विरोधात वज्रमूठ तयार करेल, असे डॉ.पुंडकरांनी सांगितले.