लोकसत्ता टीम
नागपूर: अंबाझरीतील डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याच्या निषेधार्थ व तेथेच स्मारकाच्या निर्मितीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या धरणे-आंदोलनाला शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले. यावेळी महापुरुषांची स्मारके नष्ट करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल शनिवारी मोठ्या संख्येने आंबेडकरवादी एकत्र आले होते. याप्रसंगी माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, मराठा सेवा संघाचे प्रा. प्रेमकुमार बोके, ओबीसी नेत्या यामिनी चौधरी, डॉ. सरोज आगलावे, डॉ. धनराज डहाट उपस्थित होते. प्रा. प्रेमकुमार बोके म्हणाले, डॉ. बाबासाहेबांचे स्मारक लपून- छपून पाडणे हा देशद्रोह आहे.
आणखी वाचा- ‘मन की बात’ची आज शंभरी, काय आहेत नव्या सूचना जाणून घ्या…
स्मारकाची जमीन व्यावसायिकांच्या घशात घालणे हे पाप आहे. महापुषांची विटंबना, अपमान करुन देशात अरजकता माजवण्याचा डाव प्रबुद्ध जनतेने एकजुटीने हाणून पाडायला हवा. यामिनी चौधरी म्हणाल्या, आंबेडकरी महिला, प्रबुद्ध जनतेच्या आंदोलनाला कमी लेखण्याचे पाप सरकार करत आहे. डॉ. सरोज आगलावे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंदोलकांशी चर्चा करण्यास वेळ नाही. आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे सरकारला महागात पडेल. किशोर गजभिये आणि डॉ. धनराज डहाट म्हणाले, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाकडे शासन, प्रशासनाने कमालीचे दुर्लक्ष केले आहे. याप्रसंगी मंचावर बाळू घरडे, सुधीर वासे, राहुल परुळकर, जर्नादन मून, अब्दुल पाशा, डॉ.अशोक उरकुडे, राजेश गजघाटे आणि इतर उपस्थित होते. आंदोलन मंडप हटवण्यासाठी अंबाझरी पोलिसांनी नोटीस बजावल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
उद्यानात काम करण्यासाठी कंत्राटदारास अडचण होत असल्याचे नोटिसीत नमूद असल्याचे आंदोलकांनी सांगितले. परंतु, आम्ही हटणार नसून आंदोलन कायम ठेऊ, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.