लोकसत्ता टीम
नागपूर : राज्याच्या हवामानात सातत्याने बदल होत आहेत. मान्सूनने राज्यातून माघार घेतल्यानंतर थंडीला सुरुवात होईल असे वाटले होते. पण मोसमी पाऊस गेला असला तरी अवकाळी पावसाने पाठ सोडलेली नाही. त्यामुळे रात्री आणि पहाटे हलकी थंडी तर दिवसा मात्र पुन्हा एकदा असह्य उकाडा जाणवू लागला आहे. एरवी दसऱ्यानंतर थंडीला सुरुवात होते, पण दिवाळी आली तरी यावेळी म्हणावी तशी थंडीला सुरुवात झालेली नाही.
राज्यात हवामानात सध्या मोठा बदल झाला आहे. काही जिल्ह्यात थंडी तर काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याने अलीकडेच आता थंडी पडणार असल्याचे सांगितले. तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही परिसरात तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तण्यात आला आहे. तर, कोकण पट्ट्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्याने तापमानाच वाढ होणार आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या तापमानात घट झाल्याने शहरात रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळी धुके निर्माण झाल्याने अनेक भागात दृश्यमानतेवर परिणाम होत आहे. पूर्व किनारपट्टीवर नुकत्याच ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलेल्या दाना चक्रीवादळाची पश्चिमेकडे वाटचाल सुरू झाल्याने महाराष्ट्रात आर्द्रता वाढली असून २७ ऑक्टोबरपासून शहराच्या तापमानात वाढ झाली.
आणखी वाचा-वर्गमैत्रिणीसोबत प्रेमविवाह तरीही चार तरुणींशी अनैतिक संबंध; पत्नीने कंटाळून गाठले भरोसा सेल
२८ ऑक्टोबरपासून विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पाऊस येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काहीशी घट होणार असून, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागणार आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधूनही पावसाने केव्हाचीच माघार घेतली असून, आता तापमानत घट होण्यास सुरुवात झाली आहे. हिमालयावरून येणाऱ्या शीतलहरींनी आता वेग धारण करण्यास सुरुवात केल्यामुळे हवेत गारठा जाणवू लागला आहे. तर विदर्भात अजूनही काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला देखील विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेतपीक वाया गेले.
सध्या राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू असून आगामी काही दिवस कमाल आणि किमान तापमानात असाच चढ-उतार पाहायला मिळू शकतो आणि तीन नोव्हेंबर पर्यंत राज्यात पाऊस सुरू राहू शकतो असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ञांनी यावेळी दिला आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आगामी काही दिवस पावसाची शक्यता आहे. या भागात तीन नोव्हेंबरपर्यंत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर ते दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत चक्रीय स्थिती कार्यरत आहे.
आणखी वाचा-एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, उचल नाही
त्यामुळे या भागाकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होत असून तीन नोव्हेंबर पर्यंत राज्यात असेच हवामान राहणार आहे.