चंद्रपूर : कुठलीही अधिकृत परवानगी न घेता घुग्घुस येथील लॉयड मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीने ९० गाळ्यांची निवासी वसाहत उभारण्याचे सुरू केलेले काम जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तत्काळ प्रभावात थांबवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या दणक्याने लॉयड मेटल्सचे धाबे दणाणले आहेत. परिणामी लॉयड व्यवस्थापनाकडून बांधकाम परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

म्हातारदेवी ग्रामपंचायतीकडून बांधकामाची परवानगी न घेता घुग्घुस येथील लॉयड मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीने ९० गाळ्यांची निवासी वसाहत उभारण्याचे काम सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्हातारदेवी ग्रामपंचायतीने या बांधकामाबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर कंपनीने १५ नोव्हेंबर रोजी साधे पत्र देऊन तसेच पैसे भरून बांधकामाची परवानगी मागितली. लॉयड मेटल्सने नियम धाब्यावर बसवून सुरू केलेल्या कामामुळे ग्रामस्थ चांगलेच संतापले. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. दरम्यान, लॉयड मेटल्सच्या या अरेरावीपणाची दखल जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तत्काळ प्रभावात घेतली. ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय बांधकाम सुरू असल्याची बाब निदर्शनास येताच जिल्हाधिकारी गौडा यांनी बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतरच हे बांधकाम थांबवण्यात आले आहे. दरम्यान, या बांधकामाची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे.

हेही वाचा – वर्धा : उद्योग मंत्री उदय सामंत म्हणतात, विनाउद्योग भूखंड परत घ्यावे

हेही वाचा – चंद्रपूर : बल्लारपूरमध्ये मैदानी खेळ व बॉक्सिंगसाठी व्हावी क्रीडा प्रबोधिनी, मुनगंटीवार यांची क्रीडा मंत्री यांना पत्राद्वारे मागणी

यासंदर्भात जिल्हाधिकारी गौडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लॉयडने विनापरवानगी सुरू केलेले बांधकाम थांबवले असल्याची माहिती दिली. चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी मुरूगुनाथन या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction of lloyd metals residential colony stopped chandrapur collector action rsj 74 ssb