तुषार धारकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वस्तू आणि दस्तऐवज चिरकाल जतन करण्यासाठी शांतिवन चिचोली येथे संग्रहालयाची निर्मिती करण्यात येत आहे. शासनाने संग्रहालयाची भव्यदिव्य इमारत उभी केली आहे, मात्र त्यातील संग्रहालयचे कार्य अद्यापही अपूर्णच आहेत. संग्रहालयाचे काम रखडल्याने रासायनिक प्रक्रिया झालेल्या बाबासाहेबांच्या वस्तू धूळखात आहेत.

२०११ साली कळमेश्वर मार्गावरील चिचोली येथे शांतिवन प्रकल्पाला मान्यता दिली गेली होती. शासनाच्यावतीने यासाठी ४० कोटींचा निधी मंजूर केला. २०१५ मध्ये शासनाच्यावतीने ३३ कोटी रुपये उपलब्ध करून दिले गेले. या निधीतून संग्रहालयाची इमारत, विपश्यना केंद्र, भिक्खु निवास, आनापान सत्ती केंद्रासह विविध इमारती तयार करण्यात आल्या. बाबासाहेबांचा कोट, चश्मा, टाईपरायटर, सदरा यासह ३५० वस्तूंचे जतन करण्यासाठी त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया केली गेली. लखनऊमधील ‘नॅशनल रिसर्च लॅबाॅरटरी फॉर कन्झर्व्हेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी ’ या संस्थेद्वारा वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. सध्या या वस्तू नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. रासायनिक प्रक्रिया केल्यावर या वस्तूंना एका निश्चित तापमानात आणि सुरक्षित वातावरण ठेवण्याची गरज आहे. मात्र चिचोली प्रकल्प अपूर्ण असल्याने या वस्तू धूळखात पडल्या आहे. ‘संग्रहालयातील अंतर्गत कार्य अद्यापही प्रलंबित आहे. चिचोलीमधील जुन्या इमारतीमध्ये बाबासाहेबांच्या वस्तूंचे फोटो प्रदर्शित केले जात आहेत. नव्या इमारतीमध्ये सर्व सुविधायुक्त संग्रहालयाची योजना आखली आहे, मात्र त्याचे कार्य कधी पूर्ण होईल याबाबत माहिती नाही’, अशी प्रतिक्रिया भारतीय बौद्ध परिषदेचे विश्वस्त आणि चिचोलीमधील जुन्या संग्रहालयाचे समन्वयक संजय पाटील यांनी दिली.

हेही वाचा >>>‘शासन आपल्या दारी’ ही तर सरकारची फसवेगिरी… जयंत पाटील यांचा आरोप

लवकरच प्रकल्प पूर्णत्वास येईल

‘शांतिवन चिचोली प्रकल्पाचे कार्य वेगाने केले जात आहे. संग्रहालयाची छोटी छोटी कामे शिल्लक आहे. लवकरच बाबासाहेबांच्या वस्तू संग्रहालयात बघायला मिळतील’, असे समाज कल्याण विभागाच्या नागपूर विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी सांगितले. संग्रहालय कधीपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे यावर तेलगोटे यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. निधीबाबतही त्यांनी स्पष्टपणे माहिती दिली नाही.

पंतप्रधान कार्यालयानेही फटकारले होते

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिलला शांतिवन प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचा शासनाचा मानस होता. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले गेले. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून कार्याची चौकशी केली असता अनेक कार्य अपूर्णच असल्याचे लक्षात आले. त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाकडून समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारण्यात आले होते. थेट पंतप्रधान कार्यालयाकडूनच तंबी मिळाल्याने समाज कल्याण अधिकारी प्रकल्पाबाबत स्पष्टपणे बोलायला तयार नाही आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction of museum at shantivan chicholi to preserve historical objects and documents of babasaheb ambedkar forever tpd 96 amy