नागपूर : मेडिकलशी संलग्नित बीएस्सी नर्सिंग वसतिगृहात जम्मू काश्मीर येथील विद्यार्थिनीचा नुकताच मृत्यू झाला. या विद्यार्थिनीने केवळ अर्धी पाणीपुरी खाल्ली असून तिला विषमज्वर असल्याचे पुढे आले होते. महापालिकेच्या तपासणीत येथील पाणी दूषित आढळले आहे.
शीतलच्या मृत्यूनंतर वसतिगृहातील आणखी काही विद्यार्थिनी आजारी पडल्या. त्यामुळे वसतिगृहातील पाण्याचे नमुने तपासण्यासाठी महापालिकेद्वारे घेण्यात आले होते. हे नमुने दूषित असल्याचे आढळले असून पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला आहे. या घटनेनंतर बीएस्सी नर्सिंग कॉलेज प्रशासन जागे झाले. होस्टेलमध्ये तत्काळ ‘आरओ’ आणि ‘वॉटर फिल्टर’ लावण्यात आले. येथील पाण्याचे नमुने दूषित असल्याची माहिती बीएस्सी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य ज्योती घायवट यांना देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी दिली.