नागपूर: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी शासनाकडून प्रतिसाद नसल्याने शेवटी स्थायी करण्याच्या मागणीसाठी २५ ऑक्टोंबरपासून संप सुरू केला. त्यात पूर्व विदर्भातील चंद्रपूर वगळता इतर भागातील कंत्राटी डॉक्टरांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णालयांतील रुग्णांचा जीव टांगणीला आला आहे.
आंदोलकांच्या माहितीनुसार, ओडिशा, पंजाब, राजस्थान, मणिपूरसह इतर काही राज्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना तेथील शासनाने स्थायी केले आहे. महाराष्ट्रातही या अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु, काहीही केले जात नाही. त्यामुळे १६ ऑक्टोंबरला नागपुरातील संविधान चौकात आंदोलन केले होते. त्यात मोठ्या संख्येने कंत्राटी अधिकारी- कर्मचारी सहभागी झाल्याने पूर्व विदर्भातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयातील आरोग्य सेव कोलमडली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले. यावेळी मागणी मान्य न झाल्यास २५ ऑक्टोंबरपासून संपाचा इशाराही दिला होता. परंतू शासनाकडून प्रतिसाद नसल्याने शेवटी बुधवारी चंद्रपूर वगळगता पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया येथील कंत्राटी डॉक्टर ते चतुर्थश्रेणी कर्मचारी संपावर गेले आहे. त्यामुळे येथील रुग्णांच्या विविध सेवेबाबत अडचणी वाढणार आहे.
हेही वाचा… किनगाव राजा दरोड्याचे ‘मराठवाडा कनेक्शन’! सहा गजाआड; महिला करायची ‘रेकी’
संपात कंत्राटी डायलेसिस टेक्निशियन, परिचारिका आणि इतरही कर्मचारी आहे. या विषयावर नागपूर विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रमोद गवई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही जिल्ह्यातील अधिकारी- कर्मचारी संपावर गेल्याचे कळले. त्यानंतर तातडीने सगळ्याच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना आवश्यक कार्यवाही करत एकाही रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून उपाय करण्याची सूचना केल्याचे लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.