नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कंत्राटी भरतीसाठी मागच्या सरकारवर खापर फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी तहसिलदार, नायब तहसिलदार कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी ६ सप्टेंबर २०२३ रोजी जी.आर. कोणी काढला याचे उत्तर आधी द्यावे, असे आव्हान माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले.
जळगाव जिल्हाधिकारी यांनी तसहिलदार, नायब तहसिलदार यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची जाहिरात दिली. याबाबत त्यांना विचारले असताना त्यांनी राज्य सरकारने ६ सप्टेंबर २०२३ ला जी.आर. काढला. त्यानुसार ही जाहिरात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्यात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याविरोधात युवकांमध्ये असंतोष निर्माण झाला.
हेही वाचा >>> “माफी मागा अन्यथा राज्यात उद्या सकाळी आंदोलन”, बावनकुळे असे का म्हणाले…
संपूर्ण राज्यभर याचे पडसाद उमटले, सरकारव दबाव निर्माण झाला. त्यामुळे सरकारला कंत्राटी पद्धतीने भरती रद्द करावी लागली. आमच्या सरकारच्या वेळी डाटा एन्ट्री ऑपरेटर सारख्या जुजबी पदांची तात्पुरती भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात आली. परंतु तहसिलदार, नायब तहसिलदार सारखे महत्वाचे पद कंत्राटी पद्धतीने भरणार काय, असा आमचा प्रश्न होता. अखेर सरकारने तो जी.आर. रद्द केला ही चांगली गोष्ट आहे, असे देशमुख म्हणाले.