गडचिरोली : नव्याने सुरु झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी पदभरतीविरोधात स्थानिक बेरोजगार युवकांमध्ये असंतोष आहे. जाहिरात प्रकाशित न करता परस्पर नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे, महाविद्यालय प्रशासनाला याबद्दल काहीही माहिती नसून स्थानिक बेरोजगार युवकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी मागीलवर्षी पूर्ण झाली. परंतु सुरुवातीलाच हे महाविद्यालय वादात सापडले आहे. यावर्षीपासून येथे वर्ग सुरु होणार असल्याने ६६ पदांची कंत्राटी स्वरुपात भरती करण्यात येत आहे. बिव्हीजी या खाजगी कंपनीला भरतीचे कंत्राट असून संबंधित कंपनीने कुठलीही जाहिरात प्रकाशित न करता यातील ३३ पदांची भरती केली. सोबतच उर्वरित पदे देखील याच पद्धतीने भरण्यात येत आहेत. यात लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आदी पदांचा समावेश आहे. ही बाब उजेडात येताच स्थानिक पात्र बेरोजगार तरुणांनी यावर आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा – शपथविधी काही तासांवर, संभाव्य मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात, नेते संभ्रमात

केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अनेक विभागात बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे पद भरती करण्यात येत आहे. मात्र, याबाबत स्थानिक सुशिक्षित युवक व युवती अनभिज्ञ आहे. अशाप्रकारे भरती करताना पात्र सुशिक्षितांना यासंदर्भात माहिती होणे अपेक्षित आहे. परंतु गडचिरोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या कंत्राटी पदभरती संदर्भात स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना कोणतीच माहिती नाही. त्यामुळे पात्र असताना देखील डावलण्यात येत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. यातील काहींनी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांना असमाधानकारक उत्तर मिळाले. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी आहे. कंत्राटी भरती संदर्भात शासनाने या संदर्भात दिलेल्या आदेशामध्ये पद भरतीच्या जाहिराती संदर्भात उल्लेख नाही, हे विशेष. यासंदर्भात प्रभारी अधिव्याख्याता डॉ. टेकाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित कंपनीला याबाबत विचारणार असल्याचे सांगितले.

पद भरतीच्या जाहिराती संदर्भात वरिष्ठ स्तरावरून कुठलेही निर्देश नाहीत. सूचना आल्यास त्याचे पालन केल्या जाईल. – सागर शिंदे, सहाय्यक व्यवस्थापक, बि.व्ही.जी. इंडिया

हेही वाचा – काँग्रेसने पराभूत उमेदवारांना नागपुरात बोलावले…निवडणुकीतील मानहानीवर…

शासनाने कंत्राटी पदभरती करताना स्थानिक बेरोजगार युवक युवतींचा विचार करायला हवा. अशाप्रकारे भरती करून ते आमच्यावर अन्याय करत आहेत. इतक्या पदाची भरती होत असताना पात्र स्थानिकांना याबाबत माहितीच नसेल तर या पदभरतीचा काय उपयोग. – विपुल मडावी, स्थानिक बेरोजगार युवक

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contract recruitment without advertisement discontent among local youth in gadchiroli ssp 89 ssb