अमरावती : कंत्राटदारांच्या कामचुकारपणाचे अनेक किस्से चर्चेत असतात. काही आळशी कंत्राटदार तर रस्त्याच्या कडेला पडलेले लाकूड देखील हटविण्याची तसदी घेत नाहीत आणि डांबरीकरण करतात. त्याविषयी लोक प्रसार माध्यमांवर विनोदी प्रतिक्रिया देखील व्यक्त करताना दिसतात. असाच काहीसा प्रकार अमरावतीत नवसारी परिसरात उघडकीस आला आहे. येथील कंत्राटदाराने स्वत:च टाकलेला मुरूम न हटवता केलेले रस्त्याचे अर्धवट डांबरीकरण चांगलेच चर्चेत आले आहे.
शहरातील रिंग रोड ते नवसारी गाव या १६.३९ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. रस्त्याचे काम करताना संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या कडेला मुरूम टाकला होता. रस्त्याचे खडीकरण पूर्ण झाले. जेव्हा डांबरीकरणाची वेळ आली, तेव्हा रस्त्याच्या काठावरील मुरूमाचा ढिगारा आधी हटविण्याची गरज होती. पण, कंत्राटदाराने आळखीपणा केला. ढिगारा तसाच ठेवून त्याच्या बाजुला डांबरीकरण करण्यात आले. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या लोकांच्या लक्षात हा प्रकार येताच या अर्धवट रस्त्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारीत झाली. माजी नगरसेवक प्रशांत महल्ले यांनी महापालिकेच्या या कारभारावर टीका देखील केली. कंत्राटदाराचा हा आळशीपणा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.