लोकसत्ता टीम
नागपूर : राज्यातील हजारो कंत्राटी वीज मीटर वाचक कर्मचाऱ्यांनी स्मार्ट मीटरच्या विरोधात १ फेब्रुवारी २०२५ पासून बेमुदत संप पुकारला होता. परंतु, आंदोलक संघटनांमध्ये फूट पडल्याने नागपूरसह काही जिल्ह्यातील कामगार कामावर परतले तर निम्म्या जिल्ह्यातील कर्मचारी अजूनही संपावर आहेत. या आंदोलनाकडे सरकार डोळेझाक करत आहे.
महावितरणकडून राज्यभरातील वीज ग्राहकांकडे छुप्या पद्धतीने स्मार्ट मीटर लावले जात आहेत. या मीटरमध्ये स्वयंचलित पद्धतीने मीटर वाचनाचीही सोय आहे. त्यामुळे राज्यातील हजारो कंत्राटी वीज मीटर वाचक बेरोजगार होतील, असे सांगत १ फेब्रुवारीपासून संप पुकारण्यात आला. यासाठी एम.एस.ई.डी.सी एल. मीटर रिडर कंत्राटी कामगार संघटनेसोबत इतरही काही संघटना एकत्र आल्या होत्या.
अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन प्रतिमीटर वाचनावर अवलंबून आहे. त्यामुळे वेतन बंद झाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनादरम्यान उपस्थित केला. दबावतंत्र वापरून नागपूरसह काही भागातील कर्मचाऱ्यांना सेवेवर रुजू व्हायला बाध्य केल्याचा आरोपही एम.एस.ई.डी.सी.एल. मीटर रिडर कंत्राटी कामगार संघटनेने केला आहे. राज्य सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे राज्यातील २० हजारांवर कर्मचाऱ्यांपुढे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
एम. एस. ई. डी. सी. एल. मीटर रिडर कंत्राटी कामगार संघटना काय म्हणते?
स्मार्ट मीटरमुळे आमच्यावर बेरोजगारीचे संकट घोंघावत आहे. आंदोलकांवर दबाव टाकून त्यांना कामावर बोलावले जात आहे. सध्या १५ जिल्ह्यातील मीटर वाचन बंद आहे. न्याय भेटल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी माहिती एम. एस. ई. डी. सी. एल. मीटर रिडर कंत्राटी कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष रमेश जांगळे यांनी दिली.
स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार नसल्याची होती घोषणा?
स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात राज्यभरात आंदोलन सुरू झाले होते. त्याननंतर दबाव तयार झाल्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सामान्य ग्राहकांकडे हे मीटर लावणार नसल्याची घोषणा केली होती. परंतु ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर महावितरणकडून प्रथम छुप्या पद्धतीने मीटर नादुरूस्त असलेल्या ग्राहकांकडे आणि नवीन वीज जोडणी असलेल्या ग्राहकांकडे हे मीटर लावले जात आहे. त्यामुळे सरकारने विधानभवनात दिलेल्या आश्वासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दिवसा वीज दरात सवलतीच्या नावावर….
महावितरणकडून राज्य वीज नियामक आयोगाकडे सकाळी आणि रात्री दोन वेगवेगळे वीज दर प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार दिवसा सौर वीज उपलब्ध असल्याने वीज दरात सवलतीचा प्रस्ताव आहे. परंतु रात्री ही वीज दिवसाच्या तुलनेत थोडी महाग राहणार आहे.