वर्धा : अत्यंत चूरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करीत टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकवले. त्यामुळे भारताची २०१३ पासूनची आयसीसी जेतेपदाची प्रतिक्षा संपली.
या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा याने बोलकी प्रतिक्रिया दिली. तो म्हणतो की माझ्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम क्षण आहे. मला कसेही करुन हे विजेतेपद पटकवायचे होते. पडद्यामागे आम्ही प्रचंड मेहनत घेतली. अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. त्याच मेहनतीचे हे फळ आहे. आमच्या यशाचे श्रेय संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक व खेळाडू असे सर्वांनाच जाते. पडद्यामागे असणारे तसेच व्यवस्थापन यांचा त्याने आवर्जून उल्लेख केला. त्याचाच एक महत्वाचा भाग संघाचे डॉक्टर हे पण असतात. या विजेत्या भारतीय संघाचे रेडिओलॉजिस्ट म्हणून डॉ. मुथू कुमार हे जबाबदारी सांभाळतात. ते सेवाग्राम येथील महात्मा गांधी मेडिकल कॉलेजचे माजी विद्यार्थी आहे.
येथील माजी अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे हे म्हणाले की तो १९८५ च्या बॅचचा विद्यार्थी होता. त्यास मी शिकविले पण आहे. संघास फिट ठेवण्यात निश्चित त्याचे योगदान असेल. त्यामुळे ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे. डॉ. मुथुकुमार यांचा एक जवळचा परिचय पण आहे.
मेघे विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिले अधिष्ठाता डॉ. के. एन. इंगळे यांचे ते जावई आहेत. डॉ. मुथुकुमार यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. मात्र त्यांच्या अर्धांगिनी डॉ. सोनाली मुथुकुमार ( इंगळे ) या बार्बाडोस येथून लोकसत्ता ऑनलाईन सोबत बोलताना म्हणाल्या की डॉ. मुथुकुमार हे सध्या संघासोबत आहेत. त्यांना माध्यमासोबत अधिकृत बोलणे शक्य होणार नाही. विचारणा केल्याबद्दल धन्यवाद, असे उत्तर त्यांनी दिले.
डॉ. मुथू कुमार यांनी नियमित पदवीसह स्पोर्ट्स व एक्सरसाईज मेडिसिन यात पदवीका प्राप्त केली आहे. भारत तसेच इंग्लंडमधील विविध रुग्णालयात त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. खेळाडूस झालेल्या दुखापतीचे नेमके आकलन होण्यासाठी संघ व्यवस्थापन प्रयत्न करीत असताना डॉ. मुथुकुमार त्यांच्या संपर्कात आले. दुखापतीचे स्वरूप व त्याची दुरुस्ती या बाबी पुस्तकात सांगितल्या जात नाही. मला यात विशेष अनुभव आहे. व्यस्त असल्याने मुख्य खेळाडू व अडचणीच्या बाबी भारतीय संघासाठी हाताळतो, असे ते समाज माध्यमावर व्यक्त झाले आहे. मला या दौऱ्यात सहभागी होण्याची विनंती झाली. माझा टीम इंडिया सोबत संबंध आकस्मिक व अनियोजित स्वरुपात आला आहे. मला सेवाग्राम येथे ज्युनिअर राहलेले डॉ. चार्ल्स मिन्झ हे संघाचे नियमित डॉक्टर असल्याचे डॉ. मुथू कुमार यांनी नमूद केले आहे. डॉ. चार्ल्स यांनी विमान प्रवासाच्या गडबडीत असल्याने तूर्तास बोलणे शक्य होणार नसल्याचा मेसेज दिला.
डॉ. मुथू कुमार हे हाडे, मणका,सांधे, न्युरो स्पाईन शस्त्रक्रिया यात तज्ज्ञ आहेत. संधीवातशास्त्र चमूचे मुख्य सदस्य. तसेच बहुविद्याशाखीय चमूत निर्णय घेण्यात ते अग्रेसर असून मणक्याच्या उपचारात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. एक कुशल स्पोर्ट्स मेडिसिन तज्ज्ञ म्हणून ते क्रीडा व नसांच्या दुखापतीत उपचार व्यवस्थापन साधतात. त्यात निदानात्मक व स्वतःच्या कल्पनाशक्तीचा योग्य उपयोग करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे.