नागपूर : पावसाळा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात डासांचा प्रकोप वाढतो. यातूनच डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे जीवघेणे आजार तोंड वर काढतात. ऍझोला ‘मॉस्किटो फर्न’ या दुर्मिळ वनस्पतीद्वारे डासांवर नियंत्रण ठेवणारे संशोधन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि अर्जुनी मोरगाव येथील एस. एस. जयस्वाल महाविद्यालयाने संयुक्तरीत्या केले आहे. यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील डासांचा प्रकोप नियंत्रित करीत गंभीर आजाराची तीव्रता कमी करणे शक्य होणार आहे.
ऍझोला ही वनस्पती मानवी जीवनासाठी तसेच वातावरणातील बदलावांमुळे होणाऱ्या परिणामांना नियंत्रित करण्यासाठी एक उपयुक्त वनस्पती आहे. तिचे विविध उपयोग मानवास फायद्याचे आहेत. परंतु सहज साध्या पद्धतीने व झपाट्याने वाढणाऱ्या वनस्पतीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. ही वनस्पती हजारो वर्षांपूर्वी भातशेती पिकासाठी जैविक खत म्हणून व तसेच तणाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयोगात आणल्या गेली होती. त्याचा पुरावा ‘जिया सु’ यांनी ५४० व्या शतकात लिहिलेल्या पुस्तकात आढळून येतो. याव्यतिरिक्त ऍझोला वनस्पतीचे विविध उपयोग जनसमुदायास होतात व ते पूर्णपणे दुर्लक्षित झालेले आहेत.
हेही वाचा – हुश्श… संततधार पाऊस विश्रांती घेणार, सूर्यनारायण…
सदर वनस्पतीचे महत्त्वाचे उपयोग लक्षात घेता गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील एस. एस. महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शरद रामदास देशमुख आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे यांच्या संयुक्त उपक्रमातून संशोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या संदर्भात संशोधन प्रस्ताव, संशोधन आणि विकास सेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे सादर केला होता व तो या वनस्पतीचे महत्त्व लक्षात घेता विद्यापीठाने मान्यही केला.
डासांची पैदास रोखण्याची ऍझोलाची क्षमता आणि त्यामुळे प्लाझोडियमचा प्रसार थांबविण्याची शक्ती असल्यामुळे ऍझोलाला ‘मॉस्किटो फर्न’ असेही संबोधण्यात येते. ऍझोलाचे डासांना रोखण्याच्या क्षमतेचे मुख्य कारण म्हणजे ऍझोलाचे पूर्ण आवरण क्युलेक्स डासांना अंडी घालण्याला प्रतिबंध करू शकते. जेव्हा पाण्याचा ७५ टक्के पेक्षा जास्त पृष्ठभाग ऍझोलाने व्यापलेला असतो तेव्हा अळ्यांची घनता मोठ्या प्रमाणात कमी होते. डासांच्या संख्येत लक्षणीय घट करण्यासाठी आवश्यक असलेले कव्हरेज व्यवहारीक दृष्ट्या अशक्य वाटत असले तरी सर्वांनी एकत्रितरित्या घरोघरी ऍझोलाची लागवड केली असता डासांच्या निर्मितीवर नियंत्रण करता येऊ शकते. त्याकरिता जनतेमध्ये लोकजागृती करणे आवश्यक आहे. तसेच शासनाने पुढाकार घेतल्यास बऱ्याच प्रमाणात डासांचे अर्थातच डेंग्यूसारख्या रोगांचे नियंत्रण करू शकतो.
रोगांचा फैलाव नियंत्रित करण्यास मदत
या संशोधन कार्यात या वनस्पतीची मानवी आरोग्यासाठी विशेष उपयुक्तता आढळून आली आहे. आजच्या काळात विशेषतः पावसाळ्यात झिका वायरस, चिकनगुनिया, पिवळा ताप, डेंग्यू, मलेरिया, इत्यादी यासारख्या मानवास घातक असलेल्या रोगांचा फैलाव झाल्याचे दिसून येते व त्यात अनेकांचे बळी जातात. या रोगांचा फैलाव फक्त ग्रामीण नव्हे तर शहरी भागातही मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून येते. रोगांचा फैलाव डासांपासून मानवास होतो. त्यासाठी डासांच्या वाढीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे जे कठीण आहे. पावसाळी वातावरणात अनेक ठिकाणी डबके साचतात व डासांच्या वाढीसाठी पोषक ठरतात. संशोधनातून असे आढळून आले की, ऍझोला वनस्पतीची घरोघरी लागवड केली असता डासांची पैदास चांगल्या प्रकारे नियंत्रित केल्या जाऊ शकते व त्यामुळे डासांपासून होणारे जीवघेण्या रोगांपासून मुक्ती मिळू शकते. साचलेल्या पाण्यामध्ये पावसाळ्यात ऍझोला वनस्पतीची लागवड केल्यास भवतालच्या परिसरातील संपूर्ण डासाचे नियंत्रण करता येईल व त्यामुळे विविध जीवघेण्या रोगांचा प्रादुर्भाव रोखता येईल.
असा आहे प्रयोग
ऍझोला शहरात व खेडेगावातसुद्धा डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढलेला प्रसार रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल. सध्या नागपुरात झोन निहाय आशा स्वयंसेविकाद्वारे सुरू असलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत ३२,१२१ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये दूषित भांडी, कुलर, टायर, कुंड्या, ड्रम, मडके व पक्षी व प्राण्यांची भांडी यामध्ये चिकनगुनिया डासांचा लारवा आढळून आला. यासाठी या सर्व ठिकाणी ऍझोलाची लागवड केली तर आपण डासांवर नियंत्रण मिळवू शकतो. यासाठी हे संशोधन डास नियंत्रण करून डेंगू चिकनगुनिया सारख्या रोगांवर नियंत्रण आणण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास डॉ. शरद देशमुख व डॉ. संजय ढोबळे यांनी दाखवला आहे.
हेही वाचा – नागपूर जिल्ह्यात आणखी एक स्फोट, कामगाराचा मृत्यू
संशोधनात असे आढळून आले आहे की, घरांमध्ये विशिष्ट पद्धतीने ऍजोलाची लागवड केली तर डासांच्या वाढीवर काही दिवसांमध्येच व बरेच दिवसांकरिता प्रतिबंध करता येते. तसेच ऍझोला तलाव, विहीर व इतर साचलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास जवळजवळ पूर्णपणे नियंत्रित करता येते. ऍझोला एक उपयुक्त वनस्पती आहे व त्याचे अनेक फायदे मानव जातीस होऊ शकतात. त्या संदर्भात हवेतील प्रदूषणाचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यास होत आहे. त्याचा विचार करिता प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी संशोधनामध्ये उपकरण तयार केले असून त्याचे आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त झाले आहे. या संशोधन कार्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी श्री. हरीश पालीवाल तसेच विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यास शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर यांनी प्रोत्साहन दिले आहे.
संशोधनाचा प्रस्ताव संचालक, संशोधन आणि विकास सेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी स्वीकारला व त्याला अर्थसहाय्य केले. त्याबद्दल त्यांचे संशोधकांनी आभार व्यक्त केले आहे. संशोधन कार्यास एस. एस. जयस्वाल महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष लूनकरंजी चितलांगे, उपाध्यक्ष बद्रीप्रसादजी जयस्वाल, दुर्गा शिक्षण संस्था सचिव मुकेशजी जयस्वाल यांनी प्रोत्साहन दिले. त्याबद्दल त्यांचे संशोधकांनी आभार व्यक्त केले. शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय, अर्जुनी मोरगावचे डॉ. ईश्वर माहुले यांनी संशोधन कार्यास मदत करून प्रोत्साहित केल्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानले.