नागपूर : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना नागपूर आयुक्तालयाची धुरा सांभाळून तीन वर्षे पूर्ण झाले असून त्यांचा कार्यकाळ ‘कभी खुशी-कभी गम’ असा राहिला आहे. तीन वर्षांत गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवल्याचा दावा आयुक्त करीत असले तरी गुन्हेगारी मात्र कमी झालेली नाही. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र, त्यातही अपेक्षित यश आलेले दिसत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमितेश कुमार यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडून ५ सप्टेंबरला नागपूर पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला होता. त्यांनी आल्याआल्याच सुस्त पडलेल्या गुन्हे शाखेला झोपेतून जागे केले. त्यानंतर ठाणेदारांना अवैध धंद्यांवर छापे घालण्याचे आदेश देऊन सुशासन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच शहरात वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, त्यात आयुक्त अपेक्षित परिणाम साधू शकले नाहीत. आयुक्तांनी ‘ड्रग्स फ्री सीटी’ अभियान राबवले. प्रत्येक ठाण्यात ‘नार्को कॉप्स पथक’ स्थापन केले.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! २०० रेल्वेगाड्या रद्द, यात तुमची गाडी तर नाही…?

मात्र, एनडीपीएस व ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी थेट गांजा-ड्रग्स तस्करांशी साटेलोटे करीत पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. टोळीयुद्ध संपवण्यासाठी गुन्हे शाखेने मोठे प्रयत्न केले, मात्र अजूनही गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय असल्याने आयुक्तांच्या सकारात्मक प्रयत्नांना यश आलेले दिसत नाही. पोलीस आयुक्तांनी अनुभवी पोलीस निरीक्षकांना डावलून अनुभव नसलेल्या निरीक्षकांना ठाणेदारी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. नवख्या ठाणेदारांना कायदा व सुव्यस्था राखण्यात सातत्य राखता न आल्याने आयुक्तांचा निर्णय चुकल्याची चर्चा आहे.

आयुक्तांनी राज्यात सर्वाधिक गुन्हेगारांना स्थानबद्ध केले तर आयुक्तालयात पहिल्यांदाच पारदर्शक बदल्या करीत कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला होता.

कर्मचाऱ्यांच्या लाचखाेरीचा फटका

तत्कालीन पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम् यांनी नागपुरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा पहिल्यांदा सकारात्मक प्रयत्न केला होता. मात्र, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या लाचखाेरीमुळे त्यांचा प्रयत्न फसला. त्यानंतर आयुक्त अमितेश कुमार यांनीही प्रयत्न करून बघितला. परंतु, त्यांनाही शहारातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यात अपयश आले. वाहतुकीच्या कोंडीमुळे नागपूरकर अजूनही त्रस्त आहेत.

हेही वाचा – नाना पटोले हाजीर हो! काय आहे गडकरी आणि पटोलेंमधील न्यायालयीन वाद

बदली होणार? नवे आयुक्त कोण?

येत्या काही दिवसांत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली होणार अशी चर्चा असून त्यांच्या जागेवर नवे आयुक्त म्हणून कोण येणार याकडे पोलीस विभागाचे लक्ष लागले आहे. कडक शिस्तीचे संजय सक्सेना, अनुपकुमार सिंह, विश्वास नागरे पाटील, अमिताभ गुप्ता, सुनील रामानंद आणि रवींद्र सिंगल यांच्या नावाची चर्चा आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना एका वर्षांचा कालावधी जास्त दिल्यामुळे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Control over criminals in nagpur but crime is uncontrolled cp amitesh kumar completes three years tenure adk 83 ssb
Show comments