नागपूर : ईडीने छापेमारी केलेले वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) बजरंग खरमाटे ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांच्या निरोप समारंभासाठी मंगळवारी रात्री जंगी मेजवानी आयोजित करण्यात आल्याचा दावा युवा काँग्रेसचे सरचिटणीस बंटी शेळके यांनी केला असून या आयोजनावर त्यांनी टीका केली आहे.
हेही वाचा >>> गोंदिया : आमदार विनोद अग्रवाल यांनी महावितरण अभियंत्याच्या कानशिलात लगावली
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेले तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात खरमाटे यांचे नाव पुढे आले होते. त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खरमाटे यांच्या पुणे येथील निवासस्थानी छापे घातले होते. खरमाटे यांनी गैरमार्गाने कोट्यवधींची संपत्ती गोळा केल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला होता. युवक काँग्रेसचे सरटिचणीस बंटी शेळके यांनीही गेल्या काही आठवड्यांपासून खरमाटे यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. खरमाटे यांच्या निरोप समारंभाबाबत बंटी शेळके यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट केली असून ती सध्या चर्चेत आहे.
हेही वाचा >>> तस्करांमुळे गेंडय़ांचे अस्तित्व धोक्यात; जगात केवळ २३,४३२ आफ्रिकन गेंडे शिल्लक
या पोस्टमध्ये त्यांनी वादग्रस्त अधिकाऱ्यासाठी मंगळवारी संध्याकाळी चिटणीस सेंटरला रात्री जंगी मेजवानी होणार असा दावा केला आहे. या पार्टीसाठी रक्कम कोण खर्च करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच ज्या ट्रांसपोर्ट व्यावसायिकांकडून वादग्रस्त अधिकाऱ्याने पैसे घेतले त्यांनी त्यांना गुलाबाचे फूल भेट द्यावे, असे आवाहन शेळके यांनी केले. दरम्यान, आरटीओ अधिकाऱ्यांनी शेळके यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. निवृत्त होणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांचा सन्मानासाठी समारंभ आयोजित केला जातो. हा त्यापैकीच एक असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.