चंद्रपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या विधानावरून समाजमाध्यमात अश्लील टिपण्णी करणाऱ्यांवर थेट जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. हद्दपार झालेल्याने नगरसेविका असलेल्या पत्नीसोबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला होता.
गोंडपिपरी येथील खेमदेव गरपल्लीवार हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. ते गोंडपिपरीच्या ग्रामपंचायतचे सदस्य होते. सध्या त्यांच्या पत्नी शारदा गरपल्लीवार गोंडपिपरीच्या नगरसेविका आहेत. त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या. यानंतर गरपल्लीवार दाम्पत्याने आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला व सत्तास्थापनेला पाठिंबा दिला. यादरम्यान अमृता फडणवीस यांनी वेशाव्यवसायाबाबत एक विधान केले होते. त्यांच्या मुद्यावरून खेमदेव गरपल्लीवार यांनी अमृता फडणवीस यांच्याविरोधात समाजमाध्यमातून अश्लील टिपण्णी केली होती.
भाजपने त्यावेळी याविरोधात पोलीस तक्रारही केली होती. दरम्यानच्या काळात खेमदेव गरपल्लीवार व त्यांच्या पत्नी नगरसेविका शारदा गरपल्लीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला होता. आता खेमदेव गरपल्लीवार यांना चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई प्रशासनाने केली आहे. लोकांच्या जमीनी हडपणे, विनयभंग करणे, धमकावणे, मारहाण करणे शांतता व सुव्यवस्था भंग करणे यासंदर्भात गरपल्लीवार यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. भाजपात प्रवेश घेतल्यानंतर अमृता फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्यावर आता थेट हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.