IAS Pooja Khedkar : अकोला : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात वाशिम येथे छळाची तक्रार दाखल केली आहे. वाशिम पोलिसांनी ती तक्रार सध्या चौकशीत ठेवल्याची माहिती आहे. वाशिमच्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चमूसोबत सोमवारी रात्री उशिरा तब्बल तीन तास पूजा खेडकर यांनी बंद द्वार चर्चा केली होती. ती या तक्रारीसंदर्भातच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे अनेक वादग्रस्त प्रकार समोर आले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना कामकाजादरम्यान सुसज्ज स्वतंत्र कक्षाची मागणी, कक्ष उपलब्ध न झाल्याने त्यांनी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या ‘अँटी चेंबर’चा ताबा, आलिशान वाहनावर लाल आणि निळा दिवा लावून फिरणे आदी अनेक कारणांनी त्या चर्चेत आल्या.
हेही वाचा…वारकऱ्यांच्या बसला पुसदमध्ये अपघात; रस्ता दुभाजकाला धडकली बस
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे त्याचा अहवाल पाठवल्यावर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली केली. त्यांनी यूपीएससीची परीक्षा देताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडले होते. त्याआधारे त्यांनी परीक्षा देत विशेष सवलत मिळवून आयएएस बनल्याचे समोर आले आहे. तब्बल ११ वेळा परीक्षा दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा…नागपुरात अतिसार, विषमज्वराचा विळखा… पावसामुळे झाले असे की…
दरम्यान, पूजा खेडकर वाशिम येथे कार्यरत असून दररोज नवनवीन वाद समोर येत आहेत. सोमवारी रात्री उशिरा वाशिम पोलिसांच्या चमूने पूजा खेडकर यांच्याशी शासकीय विश्रामगृह येथे तब्बल तीन तास चर्चा केली. या चर्चेचा तपशील समोर येऊ शकला नव्हता. पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात वाशिम येथे छळाची तक्रार दाखल केली. या संदर्भातच वाशिम पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. या प्रकरणात वाशिम पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
पूजा खेडकर वाशिम जिल्ह्यातून कार्यमुक्त
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वाशिम जिल्ह्यातील प्रशिक्षणाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. त्यांना मसुरी येथे २३ जुलैच्या आत हजर होण्याचे आदेश मंगळवारी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी दिले आहेत. यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आला. वाशिम जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यातील प्रशिक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या आदेश प्राप्त होताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कार्यमुक्त केले आहे.