वर्धा : येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कुमार यांचा राजीनामा स्वीकारल्याचे निर्देश राष्ट्रपती तसेच विद्यापीठाचे कुलाध्यक्ष कार्यालयाने जारी केल्याचे कुलसचिव कादर नवाज खान यांनी कळविले आहे. आता या जागेचा प्रभारी कार्यभार नागपूर आयआयएमचे निदेशक डॉ. भिमराय मेत्री हे सांभाळणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रजनीश कुमार हे आल्यानंतर वादाने शिखर गाठले होते. विद्यार्थ्यांत गटबाजी कमालीची वाढली होती. पोलिसांचा हस्तक्षेप सातत्याने वाढत होता. या वादामुळे येथे होणाऱ्या दीक्षांत सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या असलेल्या राष्ट्रपतींनी आपला दौरा वेळेवर रद्द केल्याने चांगलीच नामुष्की ओढवली होती. आपली बाजू रजनीश कुमार यांनी शेवटी पत्र परिषदेत मांडली. मात्र सर्व व्यर्थ ठरले. त्यांना राजीनामा द्यावा लागला. तो स्वीकारण्यात आल्याचे आदेश काल गुरुवारी सायंकाळी येवून पोहोचले.