लोकसत्ता टीम
बुलढाणा : कोकणातील मालवण येथे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला. यामुळे सत्ताधारी महायुती आणि विरोधक असलेली महाविकास आघाडी यांच्यात जुंपली असून राज्यव्यापी संघर्ष उभा राहिला आहे. पंतप्रधान मोदी, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सशर्त माफी मागितली असली तरी विरोधक आणि सत्ताधारी पक्ष यांच्यातील वाद शमत नसल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर दूरवरच्या बुलढाणा शहरातही ( अनावरण देखील न झालेल्या) विविध पुतळ्यांवरुन वाद निर्माण झाला आहे. याचे वादंगात पर्यवसन होण्याची दाट चिन्हे आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आक्रमक आमदार संजय गायकवाड आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्री शेळके यांच्यात जुंपली आहे. शहर सौंदर्यीकरण आणि जनतेसमोर एक आदर्श उभा राहावा या उदेश्याने आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहरातील विविध चौकात, मुख्य परिसरात महापुरुष, संत महात्मे यांचे कमीअधिक वीस पुतळे बसविण्यात आले स्मारके तयार कराण्यात आली आहे. या पुतळ्यांचे अनावरण आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते करण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे निर्धारयुक्त नियोजन आहे. प्रारंभी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुतळ्यांचे अनावरण करण्याचे नियोजन होते.मात्र लाडकी बहीण, संयुक्त महिला सन्मान सोहळे आणि मालवण येथील पुतळा धाराशायी झाल्यावर राज्यात निर्माण झालेली परिस्थिती यामुळे अनावरण काहीसे लांबणीवर पडले. आता बहुधा सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा अखेरीस हा भव्य सोहळा होणार अशी शक्यता आहे.
आणखी वाचा-केंद्रात, राज्यात भाजप सत्तेत, पण नागपुरात ‘इनकमिंग’ काँग्रेसमध्ये!
ऑडिटनंतरच अनावरण करा : शेळके
काँग्रेस नेत्या जयश्री शेळके यांनी, अनावरणाच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच ‘मागणी-बॉम्ब’ टाकला! ‘बुलढाण्यातील पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी त्याचे अनावरण करू नये’ अशी मागणी करून जयश्री शेळके यांनी खळबळ उडवून दिली. त्यांनी सांगितले की, मालवण येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.दुसरीकडे बुलढाणा शहरात आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून जवळपास २३ महापुरुष आणि संतांची पुतळे आणि स्मारक उभारण्यात आली आहेत. या सर्व स्मारक आणि पुतळ्यांच अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र मालवण प्रमाणे बुलढाण्यात अनुचित घटना घडू नये, यासाठी या सर्व पुतळ्यांचं ‘स्ट्रक्चरल ऑडिट’करण्यात यावे आणि त्याचे अहवाल सार्वजनिक रित्या जाहीर करण्यात याव, अशी मागणी देखील जयश्री शेळके यांनी केली आहे. या आशयाची निवेदने वरिष्ठ पातळीवर देण्यात आली आहे.
आणखी वाचा-विलोभनीय कडी असलेला शनी ग्रह ८ सप्टेंबरला पृथ्वीजवळ, दुर्बिणीने पाहता येणार विलोभनीय दृश्य
मुख्यमंत्री काँग्रेसला विचारून येणार नाही…
कट्टर प्रतिस्पर्धी जयश्री शेळके यांच्या या मागणीवर आमदार संजय गायकवाड यांनी नेहमीच्या पद्धतीने ठणकावून प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसवाल्यांना (काँग्रेस नेत्यांना) विचारून मुख्यमंत्री दौरा करणार नाहीत, असा टोला त्यांनी जयश्री शेळके यांना लगावला आहे. वीस तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्व पुतळ्यांचे अनावरण होणार म्हणजे होणारच असे रोखठोक उत्तर आमदार संजय गायकवाड यांनी दिले. शेळकेंच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, मीच या सर्व कामांच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ ची मागणी गेल्या महिनाभरापूर्वी मुख्य सचिवांकडे केली आहे. यामुळे अनावरण पूर्वी ऑडिट होते काय, मुख्यमंत्री शिंदे येतात काय आणि कधी येतात, अनावरण चालू महिन्यातच होणार काय असे अनेक खमंग प्रश्न बुलढाणा शहर आणि विधानसभा मतदारसंघात चर्चिले जात आहे. पुतळ्याचे प्रस्तावित अनावरण आत्तापासूनच लक्षवेधी ठरले आहे.