नागपूर : तलाठ्यांच्या सुमारे ४ हजार ६०० पदांसाठी ५ जानेवारीला सामान्यीकरण करून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी आदिवासीबहुल जिल्हे वगळता प्रसिद्ध झाली. सामान्यीकरणामुळे ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून आले. यावर समन्वय समितीसह विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता. मात्र मंगळवारी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर अंतिम यादी जाहीर झाली. परीक्षेत घोटाळा झाल्याचे अनेक पुरावे दिले असतानाही चौकशी न करताच यादी जाहीर करण्यावर समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी आक्षेप घेतला आहे. त्यानंतर आता पुन्हा नवा गंभीर प्रकार समोर आला आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने त्यांच्या ट्विटरवर तलाठी भरतीवर नवा खुलासा केला आहे. एका माजी आमदाराची मुलगी, एका जिल्ह्यामधून तलाठी भरतीत तिसरी ‘टॉपर’ आहे. त्या मुलीचा आणि स्पर्धा परीक्षेचा काडीमात्र सबंध नसल्याचा आरोप केला आहे. आता आमदारांचे मुल-मुली तलाठी, तर काही मंत्र्यांच्या मुली शिक्षिका आणि इतर शासकीय विभागात नोकऱ्यांवर लागणार असल्याने श्रीमंत आणि गरीबांमध्ये येत्या काळात सामाजिक, आर्थिक दरी अजून जास्त वाढण्याची चिन्हे आहेत असाही आरोप केला आहे.
हेही वाचा…बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य घेण्यास नकार, शिक्षणसंस्था चालकांची टोकाची भूमिका
यापूर्वी असाच आरोप टीईटी परीक्षेत झाला होता. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले होते. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली. सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची समांतर चौकशी केली होती. शिक्षक भरती घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार व विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे आल्याने खळबळ उडाली होती.
हेही वाचा…अमरावती-पुणे विशेष रेल्वे मार्चअखेरपर्यंत धावणार
टीईटी परीक्षेच्या अपात्र यादीत अब्दुल सत्तार यांच्या ३ मुली आणि एका मुलाचे नावं असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय होती. त्यानंतर आता तलाठी भरती मध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला. सामान्यीकरण (नॉर्मलायझेशन) चुकीच्या पद्धतीने झाल्याच्या आरोपांकडे दुर्लक्ष करून तलाठी भरती परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे. सामान्यीकरणात घोटाळा झाल्याचा विद्यार्थ्यांसह काही राजकीय पक्षांनीही केला होता. असे असताना भूमी अभिलेख विभागाने उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता माजी आमदारांची मुलगी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे.