नागपूर : सध्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन संघर्ष सुरु असताना निवडणूक आयोगाने ठाकरे गटाचे अडिच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केल्याचे वृत्त बाहेर आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मात्र ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी मात्र वृत्तवाहिन्यांशी बोलताना हे वृत्त फेटाळले. शिवसेनेत फूट पडल्यावर आमचीच शिवसेना खरी असा दावा उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोन्ह गटांकडून करण्यात आला होता. हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यावर आयोगासमोर आपली बाजू भक्कपणे मांडण्यासाठी ठाकरे-शिंदे गटाने आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. उद्धव ठाकरे गटाने पक्षाचे पदाधकिारी, जिल्हा प्रमुख व नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारी व त्यांच्याच नेतृत्वाखालील सेना ही खरी असल्याचा दावा करणारी तब्बल दोन ट्रक भरून ११ लाख प्रतिज्ञापत्रं निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती. यापैकी अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद झाल्याची चर्चा आहे. प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट चुकीचा असल्याने ती बाद ठरवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी यासंदर्भात आयोगाने कोणतीही माहिती दिली नसल्याच स्पष्ट केले.आपण आयोगाने दिलेल्या फॉरमॅटनुसारच प्रतिज्ञापत्रं दिली असून, हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा >>> “…तेव्हा मोदींनीच सर्वात जास्त विरोध केला होता”, ‘त्या’ प्रकरणावरून शरद पवारांनी दिल्या कानपिचक्या
कुठल्याही प्रतिज्ञापत्राची गरज नाही -फडणवीस
निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारचं कोणतंही प्रतिज्ञापत्र लागत नाही. एखाद्य पक्षाला मान्यता देणं किंवा चिन्ह देणं याचे नियम ठरलेले आहेत. गेल्या २० वर्षांंत वेगवेगळ्या आयुक्तांनी त्यासंदर्भात दिलेले निर्णय प्रमाण आहेत. त्यामुळे कुणाचे प्रतिज्ञापत्र किती आहेत, कुणाचे रद्द झालेत, कुणाचे टिकले हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी चाललं आहे,” असं फडणवीसांनी सांगितलं.
धादांत खोटा प्रचार -खासदार देसाई
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची अडीच लाख प्रतिज्ञापत्र अवैध ठरवल्याचा धादांत खोटा प्रचार सुरू आहे. निवडणूक आयोगाने कोणतेही अधिकृत निवेदन काढलेले नाही.कोणत्याही अधिकाऱ्याने भाष्य केले नाही. प्रक्रिया अजूनही सुरू आहे.ही केवळ अफवा आहे,असे शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.