नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नामवंत अशा माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करणार आहे. शताब्दी महोत्सवी वर्ष समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्याने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहेत. या माजी विद्यार्थी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, या सत्कारावर विद्यापीठाकडून कोट्यवधींची उधळपट्टी केली जाणार असल्याने ती थांबविण्याची मागणी अधिसभा सदस्य विष्णू चांगदे यांनी थेट कुलपतींकडे तक्रार करीत केली आहे.
विद्यापीठाला १०० वर्ष पूर्ण झालेल्या विद्यापीठाचे माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीमध्ये सचिव डॉ. कल्पना पांडे, प्रभारी विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. राजेश सिंह, शताब्दी महोत्सव कक्षाचे सहसमन्वयक डॉ. संतोष कसबेकर, डॉ. अनंत पांडे, प्रमोद तिजारे यांच्यासह विविध प्राधिकरणातील सदस्य आणि अधिकारी आहेत. यासाठी दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आलेले कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी तातडीची व्यवस्थापन परिषदेची बैठक घेऊन या सत्कारासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली. मात्र, यावर आक्षेप घेत, अधीसभा सदस्य विष्णू चांगदे यांनी या बैठकीतच विद्यार्थ्यांवर सात टक्के शुल्कवाढीचा बोजा टाकण्यात आल्याचे सांगून शताब्दी वर्षात विद्यार्थीची शुल्कवाढ करुन अन्याय करणारे आता करोडो रुपए फक्त ‘डोम’ उभारण्यासाठी खर्च करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणात शंकेला वाव असल्याने २३ तारखेची नियमित व्यवस्थापन परिषद बैठक असताना तातडीची बैठक घेऊन असा निर्णय का घेण्यात आला, याची चौकशी करण्याची मागणी कुलपतींकडे केली आहे. याशिवाय तत्काळ शुल्कवाढ मागे घेण्याची मागणीही चांगदे यांनी केली आहे.
हेही वाचा…३३ कोटी वृक्षलागवड प्रकरणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना “क्लीन चिट”
विद्यापीठाने घेतली होती बैठक
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नामवंत अशा माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करणार आहे. शताब्दी महोत्सवी वर्ष समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्याने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहेत. या माजी विद्यार्थी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. याबाबत जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी आढावा घेतली होती. यावेळी माजी विद्यार्थी मेळावा समिती सचिव डॉ. कल्पना पांडे यांनी मेळावा आयोजित करण्याबाबत माहिती दिली. १०० वर्ष पूर्ण झालेल्या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी समाजाच्या विविध घटकात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक नामवंत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा नावलौकिक वाढविला आहे. शताब्दी महोत्सवी वर्षात त्यांचा येथोचित सन्मान होणे गरजेचे असल्याने या मेळाव्याचे आयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी या मेळाव्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता असल्याने सर्व विभागांनी त्या दृष्टीने तयारी करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.