अकोला : प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशीम येथे बदली करण्यात आल्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. वाशीम शहरात त्यांची बदली केल्यावरून स्थानिक विधिज्ञासह संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. ॲड. संदीप ताटके यांनी वाशीम म्हणजे काय कचऱ्याची पेटी आहे का, असा प्रश्न विचारणारे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे. पूजा खेडकर यांची वाशीममधून बदली करण्याची मागणी देखील त्यांनी केली. या विरोधात रितसर याचिका दाखल करण्याचा इशाराही ॲड. ताटके यांनी दिला. पूजा खेडकर यांच्या बदलीवरून संभाजी ब्रिगेडनेही आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूजा खेडकर यांची गेल्या वर्षी प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. कामकाजादरम्यान त्यांनी सुसज्ज स्वतंत्र कक्षाची मागणी केली. कक्ष उपलब्ध न झाल्याने त्यांनी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या ‘अँटी चेंबर’चा ताबा घेतला होता. याशिवाय पूजा खेडकर यांनी आलिशान वाहनावर लाल आणि निळा दिवा लावून फिरत होत्या. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचा त्रास वाढल्याने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे त्याचा अहवाल पाठवला. त्याची गंभीर दखल शासनाने घेतली व पूजा खेडकर यांची वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली केली. पूजा खेडकर यांची यूपीएससीमार्फत झालेली निवड, प्रशिक्षणार्थी कार्यकाळात त्यांच्या विविध अवाजवी मागण्या, आलिशान वाहनांवर दिवा लावून फिरणे आदी कारणांमुळे त्या वादात अडकल्या आहेत. त्यांनी यूपीएससीची परीक्षा देताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडले होते. त्याआधारे त्यांनी परीक्षा देत विशेष सवलत मिळवून आयएएस बनल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा…हवामान खात्याचा ‘हायअलर्ट’, १८ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार
दरम्यान, विविध वाद व त्यानंतर बदली झालेल्या वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा खेडकर प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्या आहेत. त्यांच्या वाशीम येथील बदलीला आता नागरिकांमधून ही विरोध होऊ लागला आहे. वाशीम म्हणजे कचरा कुंडी आहे का? असा संतप्त सवाल ॲड. संदीप ताटके यांनी करून खेडकर यांच्या बदलीची मागणी केली. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना बडतर्फ करा, अशा मागणीचे पत्र संभाजी ब्रिगेडकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनात मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. मागण्या मान्य न केल्यास आंदोलन करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
हेही वाचा…उच्च शिक्षण संचालकांविरुद्ध १० रुपयांचा जामीनपात्र वॉरंट….पण, माफी मागितल्याने….
प्रशिक्षणाच्या वेळापत्रकात बदल
प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची वाशीम येथे बदली झाल्यानंतर वेळापत्रकानुसार प्रशिक्षण दिले जात आहे. त्या अकोला येथील आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून आठवडाभर कामकाजाचे प्रशिक्षण घेण्यासाठी रुजू होणार होत्या. त्यानंतर २२ जुलैपासून त्या विविध शासकीय विभागाच्या कामकाजाचा अनुभव घेणार असल्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, त्यामध्ये आता बदल करण्यात आल्याची माहिती आहे.