स्थलांतरित पक्ष्यांच्या अभ्यासाची जागा आता वादाने घेतली असून, अनेक निरीक्षकांकडून नोंदवली जाणारी निरीक्षणे आता वादाचा विषय ठरू लागली आहेत. गेल्या काही वर्षांत स्थलांतरित पक्ष्यांचा निरीक्षणपूर्व अभ्यास कमी आणि ‘प्रथम नोंदी’तील रस्सीखेचच वाढली आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षकांच्या या ‘प्रथम नोंदी’चा वैज्ञानिक आधार आणि सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हिवाळा आणि उन्हाळा या देशीविदेशी पक्ष्यांच्या स्थलांतरणाचा काळ समजला जातो. भारतातील विविध ठिकाणांवर होणारे विदेशी पक्ष्यांचे आगमन ही पक्षी अभ्यासकांसाठी नेहमीच पर्वणी ठरली आहे. या अभ्यासातून करण्यात आलेल्या नोंदी म्हणजे भावी पक्षी अभ्यासकांसाठी संदर्भग्रंथ ठरत आल्या आहेत. अलीकडच्या काही वर्षांत मात्र हा अभ्यास दूर सारला गेला आणि त्याची जागा चढाओढीने घेतली. परिणामी, त्यातून करण्यात आलेल्या नोंदींवरच आता आक्षेप निर्माण होऊ लागले आहेत. विदर्भातील नागपूर, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यातील तलावांवर स्थलांतरणादरम्यान विविध प्रजातींच्या विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. त्या पक्ष्यांच्या अभ्यासांऐवजी त्यांना कॅमेऱ्यात टिपण्याची आणि प्रसार माध्यमे अथवा समाजमाध्यमातून ती प्रसिद्धीला देण्याचा सोस मोठय़ा प्रमाणावर वाढीस लागला आहे. दरवर्षी हे पक्षी येतात आणि जातात. त्यातील काही पक्षी प्रथमच आलेले किंवा काही बऱ्याच वर्षांनंतर आलेले असतात. मात्र, याचा पूर्वातिहास न तपासता ती त्या प्रदेशासाठी कशी ‘प्रथम नोंद’ आहे, हे प्रसिद्धीला देण्यात अधिक स्वारस्य आले आहे. पूर्वी पक्षी निरीक्षकांकडून आलेल्या अशा नोंदी वनखात्याकडे नोंदवल्या जात होत्या आणि वनखात्याकडून दरवर्षी असा संदर्भग्रंथ अभ्यासकांसाठी समोर आणला जात होता. दरम्यानच्या काळात विदेशी निधी मिळवणाऱ्या एक-दोन संस्थांनी अशा संदर्भाची जबाबदारी हळूहळू आपल्याकडे घेतली आणि पक्षी अभ्यासावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परिणामी, वनखात्यानेही अशा नोंदी टिपण्याच्या कामातून आपले अंग काढून जबाबदारीतून सुटका करून घेतली.
पक्षी निरीक्षणातून अभ्यासाचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या मोजक्याच पक्षी निरीक्षकांनी त्यांच्या नोंदी या संस्थेकडे तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्यांचा अभ्यास स्वत:च्या नावावर खपूवन घेण्याचा प्रकार झाला. त्यामुळे आता या पक्षीनिरीक्षकांनी त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे आधीही नोंदवली गेली आहेत का, याची तपासणी न करता थेट प्रसार माध्यमे किंवा समाजमाध्यमातून प्रसिद्ध करण्याचा नवा मार्ग शोधून काढला. त्यामुळे पक्ष्यांच्या त्या त्या प्रदेशातील ‘प्रथम नोंदी’ पक्षी निरीक्षकांकडून कचऱ्याच्या ढिगाने होऊ लागल्या आहेत.
मॉन्टेग्यु हॅरिअर या पक्ष्यासंदर्भात अमरावती जिल्ह्यात असाच किस्सा घडला. या पक्ष्याची नोंद वर्षभरापूर्वीच अमरावती जिल्ह्यात झालेली होती. त्यानंतरही यावर्षी याच पक्ष्याची अमरावती जिल्ह्यात ‘प्रथम नोंद’ अशी प्रसिद्धी करण्यात आली. हा प्रकार केवळ अमरावती जिल्ह्यातच नव्हे, तर सर्वच ठिकाणी घडून येत असल्याने ‘प्रथम नोंदी’च्या वैज्ञानिक आधार आणि सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.