भंडारा : औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. नुकतीच नागपूरमध्ये याच कारणावरून दंगल घडली. त्याची धग कायम असताना भंडाऱ्यातही रात्रीपासून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. एका आरोपी तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर औरंगजेबचे स्टेटस ठेवले. एवढेच नाही तर इतरांच्या धार्मिक भावना दुखावतील अशा आक्षेपार्ह पोस्ट सुद्धा टाकल्या. त्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी पोलीस ठाणे गाठत तरुणाला अटक करण्याची मागणी लावून धरली. अखेर रात्री उशिरा या तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकारामुळे भंडाऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री प्रकाश उमाशंकर पांन्डे (४६) यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी तरुणाविरोधात रात्री उशिरा आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पांडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपी शोएब शेख याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर औरंगजेबाच्या दोन स्टोरी टाकुन हिंदु धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या. प्रथम स्टोरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटोवर” बादशाह तो बोहोत सारे थे..! असे पोस्ट केलेले असुन, नंतर लगेच औरंगजेबाचे फोटोवर ” लेकिन बाप एक ही था..! असे पोस्ट केलेले आहे, शिवाय त्या खाली सुद्धा इंग्रजीमध्ये इतरांच्या धार्मिक भावना दुखावतील असे उद्गार लिहून पोस्ट केले होते. दुसऱ्या स्टोरी मध्ये औरंगजेबाचे फोटो समोर अनेक लोक जमलेले असुन, सदर स्टोरीच्या गाण्यावर *ना सजा ना माफी, तुम्हारी सिस्टम फाडने के लये सिर्फ हजरत औरंगजेब आलमगीर का नाम हि काफी” असा आवाज असुन, त्यानंतर लगेच “बाप ही बाप रहेगा ” हे गाणे टाकले होते.

आरोपी शोएब शेख रा. भंडारा याने त्याच्या इंस्टाग्राम वर टाकलेल्या दोन्ही पोस्ट छत्रपती शिवाजी महाराज यांना कमी लेखून औरंगजेबाचे वर्चस्व दाखवून आमच्या धार्मिक भावना दुखावल्याने शोएब शेख याचे विरुध्द कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पांडे यांनी तक्रारीतून केली आहे.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्याला अटक करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे सुमारे दोनशेच्या जवळपास कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

Story img Loader