अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील स्वागत प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास गावातील एका गटाने विरोध दर्शविल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच बुधवारी गावातील दीडशे ते दोनशे ग्रामस्थांनी गाव सोडले असून ते पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. वाटेत आंदोलकांशी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी चर्चा करणार आहेत. गावातील तणावाचे वातावरण लक्षात घेता, मंगळवारी रात्रीपासूनच गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
स्वागत कमानीचा वाद जुना आहे. पांढरी खानमपूर ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २०२० रोजी गावामध्ये प्रवेशद्वार उभारुन त्याला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असे नाव देण्याचा ठराव ग्रामसभेत घेतला होता. परंतु याच कालावधीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे २६ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा एकदा ठराव घेऊन डॉ. प्रवेशद्वाराच्या अंमलबजावणीवर कोणीही आक्षेप घेणार नाही असाही ठराव पारीत करण्यात आला होता. तसेच खानमपूर गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर बांधकाम करण्यासाठी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय राज्य महामार्ग विभाग, अकोला यांच्याकडूनही २२ फेब्रुवारी २०२४ ला प्रवेशद्वाराच्या बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त देण्यात आले होते. या सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता केल्यानंतर मात्र गावातील एका गटाकडून या प्रवेशद्वाराला विरोध करण्यात आला.
हेही वाचा – रणजी करंडक : मध्यप्रदेशला पराभूत करत विदर्भ संघ अंतिम फेरीत
हेही वाचा – खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी; पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून…
गावातील बौद्ध बांधवावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला. या सर्व प्रकारामुळे गावातील दीडशे ते दोनशे बौद्ध बांधवांनी बुधवारी गाव सोडून मंत्रालयावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व प्रकारामुळे सामाजिक सलोखा कायम रहावा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावामध्ये ८ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून गावामध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गाव सोडून निघालेले ग्रामस्थ हे अंजनगाव सुर्जी, दर्यापूर मार्गे अमरावतीत येऊन जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना निवेदन देणार आहेत, त्यानंतर येथून सर्व मुंबई येथील मंत्रालयाच्या दिशेने पुढील प्रवास सुरु करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.