अकोला: आमदार बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यामध्ये सत्तेतील हिश्श्यावरून वाद आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यात अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. आम्हाला जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचे आहे, त्यांच्या वादाशी काही देणे-घेणे नाही, असेही पटोलेंनी स्पष्ट केले. ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे पटोले आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्तेत सहभागी बच्चू कडू व रवि राणा यांच्यावर पटोले यांनी निशाणा साधला. कडू व राणांमध्ये हिश्श्याचे भांडण सुरू आहे. सत्तेमध्ये बसलेले आमदार ५० खोक्यांसाठी भांडत असतील, आरोप-प्रत्यारोप करत असतील, पण त्यांच्यापेक्षा आम्हाला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या दोघांच्या भांडणावर लक्ष देण्याचे काही कारण नाही, असे पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा >>> वर्धा, सेलू काँग्रेस समितीचे अध्यक्षपद शेंडे गटाच्या ताब्यात ; रणजित कांबळे गटाला झटका
अकोला शहरात सलग हत्येच्या दोन घटना घडल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. ते सुपरमॅन आहेत, सहा-सहा जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेतले. मात्र, आता काम जमत नाही. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे, कुठेही सरकारचे लक्ष नाही. फक्त सत्ताधारी राज्याच्या तिजोरीतील जनतेचे पैसे लुटत आहेत. भ्रष्टाचार आणि भय या दोन गोष्टीच्या आधारावर महाराष्ट्रातले ईडीचे सरकार निर्माण झालेले आहे. ते फक्त लूटपाट करण्यासाठी असून जनतेच्या सुरक्षेसाठी नाही, असा आरोप पटोले यांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्रातील बेरोजगारी, गरीबांचे प्रश्न, उद्योग-व्यवसाय यासंदर्भात कुठलीही चर्चा सत्ताधाऱ्यांकडून केली जात नसल्याची टीका देखील नाना पटोले यांनी केली.