मागील काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठांवर केलेल्या नियुक्त्यांमुळे पुन्हा वादाला तोंड दिले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपालांनी मंगळवारी काही सदस्यांच्या नियुक्त्या केल्या. यामध्ये शिक्षण क्षेत्राशी कुठलाही संबंध नसणाऱ्या व्यक्तींच्या नियुक्त्या राज्यपालांकडून करण्यात आल्याचा आरोप शैक्षणिक क्षेत्रातून होत आहे. या नियुक्त्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपशी संबंधितांचा भरणा असल्याचे दिसून येते.
हेही वाचा- नागपूर: केंद्राचे धोरण शेतकऱ्यांची गळचेपी करणारे; प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत ठराव
राज्यपालांनी नुकतीच नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून अभाविपचे माजी प्रदेश संघटनमंत्री समय बनसोड यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर मंगळवारी अधिसभेवरील दहा जागांसाठी राज्यपाल नामित सदस्यांच्या नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये माजी खासदार अजय संचेती यांचा मुलगा निर्भय संचेती यांची निवड करण्यात आली. याशिवाय प्रमुख नावांमध्ये कविता लोया, शुभांगी नक्षीने यांचीही निवड झाली आहे. अन्य सदस्यांमध्ये डॉ. कुमूद रंजन, डॉ. किशोर इंगळे, राज मदनकर, डाॅ. विजय इलोरकर, डॉ. उर्मिला क्षीरसागर, ॲड. निरजा जवाडे, महेंद्र लामा यांचा समावेश आहे.