अकोला : शहरातील अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या श्रेयावरून चढाओढ सुरू झाली आहे. रुग्णालयाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप नेते करीत असून रुग्णालयासाठी निधी व पदे काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातच मंजूर झाल्याचा दावा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी केला आहे. अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी १२० कोटी रुपये मोदी सरकारने मंजूर केल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लोकार्पण सोहळ्यात केला; परंतु रुग्णालय स्थापनेमागे भाजप सरकारचा कोणताही संबंध नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. सुधीर ढोणे यांनी १५ ऑगस्ट २०१३ रोजी तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांची भेट घेऊन अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी निवेदन दिले. त्यावर मंत्र्यांनी शेरा लिहून केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना दिले. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने केंद्र सरकारकडे अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. डॉ. सुधीर ढोणे यांनी नवी दिल्लीत सार्वजनिक आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी आपल्या अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यात रुग्णालय स्थापन करण्याची घोषणा केली होती.

हेही वाचा >>> “साहेब मुलगा लांब नोकरीला, आम्ही वृद्ध, त्याच्या बदलीसाठी प्रयत्न करा”; वृध्दांची गडकरींना विनंती

प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत तिसऱ्या टप्प्यात देशातील ३९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अद्ययावतीकरण या योजनेअंतर्गत अकोल्यातील अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी ७ नोव्हेंबर २०१३ रोजी १५० कोटी रुपये मंजूर केले होते. यापैकी १२० कोटी रुपये केंद्र सरकारचा तर ३० कोटी राज्य सरकारचा हिस्सा होता. त्यावेळी केंद्रात व राज्यात दोन्ही ठिकाणी काँग्रेस आघाडीचेच सरकार होते, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. राज्यात २०१४ ते २०१९ या काळात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते.

हेही वाचा >>> सावधान! ई-सेवा केंद्राच्या नावावर बनावट प्रमाणपत्रे!; अनेक टोळ्या सक्रिय

या पाच वर्षांच्या काळात भाजप सरकारने रुग्णालयासाठी आवश्यक वर्ग-एक ते वर्ग-चार ही पदे निर्माण केली नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर डॉ. सुधीर ढोणे यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ८ जानेवारी २०२१ रोजी अकोल्यासह राज्यातील यवतमाळ, लातूर, औरंगाबाद येथील रुग्णालयांसाठी ८८८ पदे मंजूर केली. जिल्ह्यातील भाजप नेत्यांना खरोखर तळमळ असती तर त्यांनी भाजप सरकारच्या काळात पदे मंजूर करून घेतली असती, असा टोला काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी लगावला.

भाजप नेत्यांचा केविलवाणा प्रयत्न

रुग्णालयाच्या स्थापनेसाठी तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या केंद्र सरकारने निधी मंजूर केला. रुग्णालयासाठी पदनिर्मिती मंजूर झाली, त्यावेळीही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. भाजप सत्तेच्या काळात रुग्णालयासाठी निधी व पदनिर्मितीबाबत कोणतेही काम झालेले नाही. तरी रुग्णालयाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपचे नेते करीत असल्याचा आरोप अशोक अमानकर यांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over intensive care hospital credits funds posts only during congress government ppd 88 ysh
Show comments