गडचिरोली : शेती हेच गावातील नागरिकांच्या उपजिविकेचे एकमेव साधन असून विमानतळामुळे गावातील तलाव, बोळी, नाले, गुरे चराईचे झुडपी जंगल आणि शेतीक्षेत्र नष्ट होणार आहे. त्यामुळे कोटगल उपसा जलसिंचनाचे लाभक्षेत्र असलेल्या सूपीक शेतजमिनी विमानतळाकरिता संपादीत करण्यासाठी ग्रामसभा शिफारस करणार नाही, असा ठराव करत पुलखल ग्रामसभेने गावाच्या हद्दीत भूसंपादनास विरोध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट पुलखल ग्रामसभेने बुधवारला ग्रामसभा घेवून वरील ठराव पारीत केला. या ठरावात ग्रामसभेने म्हटले आहे की, प्रस्तावित विमानतळ गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरिता मोलाचे योगदान देणारे ठरणार असले तरी त्याचे प्रास्तावित ठिकाण हे आमच्या पुलखल गावातील व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या कोटगल बॅरेज व कोटगल उपसा सिंचन लाभक्षेत्रातील सुपीक जमिनीचे आहे. याच शेतजमिनींवर गावातील शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. पुलखल गावाच्या हद्दीतील तलाव, बोळी व झुडपी जंगलाची काही जमीन यात समाविष्ट असल्याने गावातील उर्वरित शेत जमिनीचे व गुरांच्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नष्ट होणार आहे. गडचिरोली-चंद्रपूर या महामार्गाला जोडणारा पुलखल गावाचा मुख्य रस्ताही कायमचा बंद होणार आहे. गावाचे पारंपारिक देवस्थान एक बोटी माऊली व इतर श्रद्धास्थाने ही नष्ट होणार आहेत. तसेच मुरखळा गावाच्या हद्दीतून पुलखल – मुडझा गावाच्या सीमेवरून असलेल्या नाल्याला वैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याचा दाब ( बॅकवॉटर ) मोठ्या प्रमाणावर नैसर्गिकरीत्या राहते. विमानतळामुळे सदर नाला (वगर) बुजविल्या जाणार असल्याने पुलखल – मुडझा रस्त्याला व शेतीला पुराचा मोठा फटका बसणार आहे.

त्यामुळे विमानतळाकरिता पुलखल गावाच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, तलाव, बोळी, झुडपी जंगल, नाला (वगर) व इतर जमीन भूसंपादित करणे हे पुलखल गावातील शेतकरी व इतर नागरिकांवर भविष्यातील उपासमारी आणणारे, शेत जमिनींचे क्षेत्र कमी करणारे, जमिनीच्या मालकी हक्क आणि गावाच्या सामूहिक मालमत्तांच्या मालकी हक्क हिरावणारे ठरणार असल्याचे म्हटले आहे.

पुलखल गावाच्या संबंधात अनुसूची क्षेत्रातील कायदे व नियमाअन्वये प्राप्त अधिकारानुसार विमानतळाकरिता पुलखल गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गावाच्या सामूहिक साधन संपत्ती असलेल्या बोडी, तलाव, नाला व झुडपी जंगलाच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात येऊ नये व त्या संबंधातील ग्रामसभेची शिफारस शासनाकडे करण्यात येऊ नये, तसेच जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामसभेकडे मागणी करण्यात आलेली भूसंपादनाची शिफारस आमच्या आजच्या ग्रामसभेने नाकारावी असा ठराव पारित करण्यात येत असल्याचेही ग्रामसभेने आपल्या ठरावात म्हटले आहे.

तथापि सदर विमानतळाकरिता कोटगल बॅरेज व कोटगल उपसा सिंचन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सुपीक शेत जमिनी, गावाच्या सामूहिक मालमत्ता असलेल्या बोडी, तलाव, नाले, झुडपी जंगल अशा जमिनींचे भूसंपादन करून अनुसूची क्षेत्रातील नागरिकांच्या अधिकारावर गदा आणण्या ऐवजी चामोर्शी रोड वरील सेमाना देवस्थान समोरील व गडचिरोली शहराला लागून असलेल्या जंगलाच्या जागेत सदर विमानतळ प्रस्तावित करण्यात यावा, अशी सूचना पुलखल ग्रामसभेने शासनाकडे केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over proposed airport in gadchiroli district ssp 89 amy