देवेश गोंडाणे, लोकसत्ता
नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्याची आठवण म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना करून या समितीने दीक्षाभूमीची उभारणी केली. दीक्षाभूमी आज देशातील नव्हे तर जगातील लोकांसाठी प्रेरणेचे स्थान आहे. असे असतानाही अनेक वर्षापासून गुन्या गोविंदाने सुरू असलेल्या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
मागील काही दिवसांमध्ये स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी प्रकृतीचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजेंद्र गवई यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. मात्र हा संपूर्ण प्रकार दीक्षाभूमी स्मारक समितीच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयांमध्ये २७ सहाय्यक प्राध्यापक भरतीवरून सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. या २७ जागांवर महाविद्यालयामध्ये अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवेत असलेल्या प्राध्यापकांना संधी द्यावी अशी इच्छा सुधीर फुललेले यांची होती. मात्र इतर सदस्यांनी याला विरोध केला. या प्राध्यापक भरतीच्या निमित्ताने पैसा कमावण्याची संधी असल्याचे काही सदस्यांच्या ध्यानात आले. त्यामुळे त्यांनी फुललेले यांच्या प्रस्तावाला विरोध केल्याचा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष मंडपे यांनी केला आहे. प्राध्यापक भरतीमध्ये भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने सुधीर फुललेले यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही मंडपे यांनी केला आहे.
आणखी वाचा-वर्धा : कलंक कायम ! अवघ्या सहा महिन्यात ४८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मंडपे यांनी आरोप केलेल्या निवेदनावर, स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझले यांच्या राजिनाम्याची चर्चा वृत्तपत्रात तसेच विविध माध्यमातुन समोर येत आहे. तसेच कधी त्यांच्या प्रकृतिची कारणे समोर ठेऊन किंवा इतर कारणांने त्यांनी राजिनामा देल्याचे सांगण्यात येत आहे.
परंतु सत्य परिस्थिती वेगळी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाचे २७ पदे भरण्याकरिता शासनातर्फे परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार पदभरतीकरीता आवश्यक असणा-या सर्व प्रक्रिया सुरु करण्या आल्या. ही पदभरती नियमानुसार व्हावी तसेच मागील १२ ते १५ वर्षापासुन महाविद्यालयात कार्यरत कंत्राटी प्राध्यापकांना आता या पदाकरिता प्राधान्य देण्यात यावे व त्यानंतर गुणवत्तेनुसार पदाभरती घेण्यात यावी या प्रकारचे विचार स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझले यांचा होता. परंतु त्यांच्या विचाराचा कुठेही मान न ठेवता काही सद्स्यांनी कोट्यवधी रुपयांच्या लालसेने संस्थेचे अध्यक्ष तसेच इतर पदाधिकार-यांना डावलून डॉ. सुधीर फुलझले यांना दबावात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. फुलझेले यांच्या काळात कोणत्याही प्रकारचे भ्रष्टाचार किंवा तक्रारी आल्या नाहीत. परंतु त्यांना सचिव पदावरुन काढल्याचे समाजताच संस्थेच्या सदस्यांकडून विविध प्रकारे भ्रष्टाचार होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे तात्काळ हा प्रकार थांबवावा, फुलझेले यांना परत घ्यावे अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.