‘आपल्या नवऱ्याप्रमाणे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना कन्व्हिन्स करा, असे लज्जास्पद बोलून महिला कर्मचाऱ्याचा मानसिक त्रास दिल्याने बँकेच्या सहायक महाप्रबांधकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार भंडारा येथील स्टेट ऑफ इंडियाच्या मिस्कीन टँक शाखेत घडला.
हेही वाचा >>>बुलढाणा: करायला गेले काय अन् झाले उलटे पाय… वाचा फसलेल्या बसचोरीची अजब कथा
राष्ट्रीयीकृत बँकेतील कर्मचारी सुविधा देण्याऐवजी नेहमी मानसिक त्रास देत असल्याची ओरड ग्राहकांकडून सातत्याने होत असते. परंतु, या त्रासाचे बळी केवळ बँक ग्राहकच ठरत नसून कनिष्ठ कर्मचारी देखील आहेत, हे भंडारा येथील स्टेट बँकेच्या शाखेत घडलेल्या प्रकारावरून उघडकीस आले. या बँकेत उच्च श्रेणी लिपिक पदावर कार्यरत महिला कर्मचारी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाईट नजरेची शिकार झाली. आरोपी सत्यस्वरूप मेश्राम (४७, रा. आर.बी.ओ. रिझन- ५ गोंदिया) हा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सहायक महानिबंधक पदावर आहे. त्यामुळे तो भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये भेट देत असतो.
हेही वाचा >>>नागपूर: रुक्ष कारागृहही गहिवरले, कैद्यांच्या मुलांची गळाभेट
१३ नोव्हेंबर रोजी भंडारा येथील बँकेच्या मिस्कीन टँकचा शाखेत भेट देऊन संपूर्ण कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी महिला कर्मचाऱ्याला ‘आपल्या नवऱ्याला जसे ‘कन्व्हिन्स’ करता, तसे ग्राहकांना सुद्धा का ‘कन्व्हिन्स’ करत नाही?’ अशा अपमानजनक भाषेत बोलले. ग्राहकांसमोर अशा भाषेत बोलल्याने महिला कर्मचाऱ्याला हेतूपुरस्सर वाईट वाटेल, असा प्रकार करण्यात आल्याने याची तक्रारी भंडारा पोलीस ठाण्यात करण्यात आली. याप्रकरणी आरोपी सत्यस्वरूप मेश्राम याच्यावर भांदविच्या कलम ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कराडे हे करीत आहेत.