लोकसत्ता टीम
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालय परिसरात (स्मृती मंदिर परिसर ) भाजप व संघ पदाधिकारी यांच्यात समन्वय बैठक होत आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत. आगामी लोकसभा निवडणूक आणि अयोध्येतील राममंदिर लोकार्पण समारंभ या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जाते.
संघ परिवारातील सर्व संघटनांच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची भाजपच्या नेत्यांसोबत नियमित कालावधीत समन्वय बैठक होत असते. त्यात संघ आणि भाजप यांच्यातील समन्वयासोबत संघाकडून भाजपला महत्वाच्या सूचना दिल्या जातात. आजची बैठकही त्याच स्वरूपाची असली तरी या बैठकीत अयोध्या येथील राम मंदिर लोकार्पण समारंभानिमित्त भाजप व संघाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात येणार आहे.
आणखी वाचा-“खासदारांचे सोडा, मला निवडून द्या, तेली समाजास मी भवन देतो,” वर्धेत दोन नेत्यांत रंगली जुगलबंदी
शिवाय लोकसभा निवडणुकींपूर्वी होणारी ही अखेरची बैठक असल्याने बैठकीचे महत्त्व वाढले आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस या बैठकीत भाजपकडून सहभागी झाल्यामुळे राजकीय मुद्यावर या बैठकीचे चर्चा होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार महानगर संघ चालक राजेश लोया यांच्यासह संघाकडून संघाचे प्रांत अधिकारी, क्षेत्र अधिकारी उपस्थित आहेत.