माहिती कार्यालयाचा गोंधळ
वर्धा : आज दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीचीच चर्चा झाली. स्थानिक रामनगरातील अजिंठा विद्यालयातील वर्गात एका विद्यार्थ्यजवळ प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स कॉपी आढळून आल्याची चर्चा झडली. तशी प्रेस नोट जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने पाठविली. हा तर गंभीर गुन्हा म्हणून शिक्षणाधिकारी जगताप यांना विचारणा केल्यावर ते म्हणाले की, हे तर धाधांत खोटे.असे असते तर पोलीस ठाण्यात तक्रार करावी लागते, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. यानंतर दोन्ही शासकीय विभागाची धावपळ सुरू झाली. चूक दुरुस्त होईपर्यंत परीक्षा पद्धत मात्र चांगलीच वादग्रस्त ठरली. रात्री अखेर माहिती कार्यालयाने दुरुस्ती करीत प्रश्नपत्रिका नव्हे तर गाईडची कॉपी सापडल्याचा खुलासा दिला. मात्र शोभा व्हायची ती झालीच.