महेश बोकडे
नागपूर: उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयातही करोनाने शिरकाव केला असून येथील तीन रुग्णांना बाधा झाली आहे. दरम्यान गुरुवारी जिल्ह्यात २४ तासांत १६ रुग्ण आढळून आले. प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या तीन रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, तापाचे लक्षणे होती. त्यांची तपासणी केली असता त्यांना करोनाचे संक्रमन झाल्याचे निदान झाले. यापैकी दोघांना एकही लक्षणे नाही. तर एकाला सौम्य लक्षणे असून त्याला करोनाग्रस्तांच्या वार्डात ठेवले आहे.
दरम्यान गुरूवारी दिवसभऱ्यात शहरात ९, ग्रामीणमध्ये ६, जिल्ह्याबाहेरील १ असे एकूण १६ नवीन करोनाग्रस्त आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ९९ हजार ७१६, ग्रामीण १ लाख ६८ हजार २४७, जिल्ह्याबाहेरील ९,९७५ अशी एकूण ५ लाख ७७ हजार ९३३ रुग्णांवर पोहचली. दिवसभऱ्यात शहरात ८८३, ग्रामीणला ३२५ अशा एकूण १,२०८ संशयितांची चाचणी करण्यात आली.
सक्रिय रुग्णसंख्या ६४
शहरात दिवसभऱ्यात ७, ग्रामीणला २, जिल्ह्याबाहेरील १ व्यक्ती करोनामुक्त झाला. तर २४ तासांत सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या शहरात ४०, ग्रामीणला २२, जिल्ह्याबाहेरील २ अशी एकूण ६४ नोंदवली गेली.
शहरात धोका वाढला
दिवसभऱ्यात शहरात आढळलेल्या ९ नवीन रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांचा शहराबाहेर प्रवासाचा इतिहास नाही. त्यामुळे शहरात काही प्रमाणात संक्रमन पसरल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. परंतु प्रत्यक्षात बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी केली असता बहुतांशांचे अहवाल नकारात्मक येत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे.