नागपूर :  राज्यात ६ ऑगस्टपर्यंत ४.६३ कोटींहून अधिक नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यात राज्यातील १२ जिल्ह्यांतील दहा लाखांवर नागरिकांनी लस घेतली आहे. सर्वाधिक लस घेतलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरचा समावेश आहे. आरोग्य विभागाचा अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

करोना प्रतिबंधक लसीबाबत आजही समाजात अनेक  गैरसमज आहेत. त्यामुळे राज्यातील काही भागात लसीकरणाला प्रतिसाद कमी आहे. हे गैरसमज दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. कोविन पोर्टलवरील आकडेवारीनुसार, राज्याच्या आरोग्य विभागाने ६ ऑगस्टपर्यंत नागरिकांना ४ कोटी ६३ लाख ७६ हजार ८८६ लस मात्रा दिली. त्यात ३ कोटी ४५ लाख ३० हजार ७१९ नागरिकांनी  पहिली मात्रा तर १ कोटी १८ लाख ४६ हजार १६७ नागरिकांनी  दुसरी मात्रा घेतली आहे. सर्वाधिक ७७ लाख ४७ हजार ४४८ लस मुंबईतील नागरिकांनी घेतली. त्यानंतर पुण्यात ६५ लाख ४ हजार ७२९, ठाण्यात ३६ लाख ९९ हजार २११  तर नागपुरात २५ लाख ५१ हजार ७४० लसलाभार्थी आहेत. नाशिकला १९ लाख ८० हजार ४६, कोल्हापुरात १८ लाख ८९ हजार ८६६, औरंगाबादला १२ लाख ६० हजार ५०२, अहमदनगरला १३ लाख २७ हजार ९७३, जळगावला १० लाख ५७ हजार ६५६ नागरिकांनी लस घेतली. या वृत्ताला आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

तीन जिल्ह्यांत पाच लाखांहून कमी मात्रा

राज्यातील तीन जिल्ह्यांत पाच लाखांहून कमी नागरिकांनी लस  घेतल्याचे पुढे आले आहे. त्यामध्ये गडचिरोली ३ लाख ४२ हजार ६९८, हिंगोली २ लाख ८९ हजार ४१८, तर उस्मानाबादेतील ३ लाख ८३ हजार ४४७  नागरिकांचा समावेश आहे.

Story img Loader