अकोला : देशात सध्या सत्तेसाठी राजकारणाची पातळी प्रचंड घसरली आहे. विचित्र पद्धतीने सत्ता चालवली जात असून सर्वत्र हुकूमशाही पसरली आहे. देशातील लोकशाही धोक्यात आली. कारवाईच्या भीतीने सर्व पक्षांतील भ्रष्ट नेते भाजपामध्ये एकत्र बसले आहेत, अशी खरमरीत टीका विचारवंत विश्वंभर चौधरी यांनी येथे केली.

‘आम्ही सारे अकोलेकर’च्यावतीने शनिवारी सायंकाळी आयोजित ‘दोन तास लोकशाहीसाठी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहिद सुमेध गवई यांच्या मातोश्री मायावती गवई होत्या, तर प्रमुख उपस्थितीत अ‍ॅड. असीम सरोदे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष विजय कौसल, निर्भय बनो नागपूरचे समन्वयक संदेश सिंघलकर, पुण्याचे समन्वयक उत्पल व्ही.बी. आदी उपस्थित होते. भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सध्या सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.

हेही वाचा – संतनगरी शेगावातून एल्गार रथयात्रेचा प्रारंभ; हजारो शेतकऱ्यांचा सहभाग, रविकांत तुपकर म्हणाले “ही आरपारची लढाई…”

विश्वंभर चौधरी म्हणाले की, देश कुणीकडे वाटचाल करतोय हे समजायला मार्ग नाही. देशात महागाई आणि बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही. वास्तव जिवंत मुद्यांना सोडून भावनिक मुद्यांकडे वळविले जाते. भाजपाने विरोधकांना संपवण्याचे प्रयत्न करण्याऐवजी महागाई आणि बेरोजगारी मुक्त भारत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

चौधरी यांनी देशातील कृषी क्षेत्रावरही भाष्य केले. देशातील शेतकरी वर्ग सध्या संकटात आलेला आहे. २०१४ नंतर शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे बाजार भाव घसरले तर दुसरीकडे उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होत असल्याचे देशात चित्र आहे, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – धाड मध्ये उभे राहणार दिमाखदार शिवस्मारक; पायाभरणीत गडकिल्ल्यांची माती अन् जल!

निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकटे वाढली आहेत. बळीराजा अडचणीत आला. देशात सुमारे ५०० च्यावर शेती उत्पादन घेतले जाते. त्यापैकी केवळ २४ पिकांनाच आधारभूत किंमत केंद्र सरकार जाहीर करते. शेती उत्पादनाचे बाजारभाव घसरले असून, बी. बियाणे, रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत. देशात गत दहा वर्षांमध्ये सर्वाधिक हानी शेतकऱ्यांची झाली. ऐन शेतमाल बाजारात आल्यानंतर भाव पाडले कसे जातात? बाजारभावाशी खेळ का होतोय? असे असंख्य प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावे लागतील, असेदेखील चौधरी म्हणाले.

देशात लोकशाहीवर अतिक्रमण वाढत चालले आहे. परंतु ‘निर्भय बनो’च्या माध्यमातून लोकशाहीला घातक असणाऱ्यांच्या विरोधात एल्गार उभा राहत असल्याचे कायदे विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सांगितले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गर्दी होती.

Story img Loader