चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी मागे घेण्यात आल्यानंतर मद्यपरवाने मंजूर करताना माेठ्या प्रमाणात गैरव्यवहार, अनियमितता व लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदिप दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्यात आले आहे. हे पथक सर्व परवान्यांची तपासणी करणार असल्याने मद्यविक्रेत्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेण्यासाठी एक समिती गठीत केली होती. या समितीच्या अहवालानंतर २०२१ मध्ये दारूबंदी मागे घेण्यात आली होती. दारूबंदी मागे घेतल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मद्य परवाने वितरित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, मद्य परवाने मंजूर करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, अनियमितता व लाचखोरी झाल्याचे समोर आले आहे. तसेच उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील यांना ‘बियर शॉपी’ परवान्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना ९ मे २०२४ ला अटक करण्यात आली होती. या घटनेने उत्पादन शुल्क विभागात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, पाटील यांनी नियमांची पायमल्ली करून तीन वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात मद्य परवाने मंजूर केले. या सर्वांची चौकशी करण्यासाठी हे विशेष तपास पथक गठीत करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठवल्यानंतर (शासन अधिसूचना ८ जून २०२१ नंतर) नुतनीकरण करून कार्यान्वित करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्ती, नव्याने मंजुर करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्ती, नव्याने मंजुर करण्यात आलेल्या तथा इतर जिल्ह्यांतून स्थलांतरित होवून आलेल्या अनुज्ञप्ती (प्रकारानुसार : सीएल-३, एफएल-३, एफएलबीआर-२ इ.) या आक्षेपाबाबत आणखी काही तक्रारी असतील किंवा यातील आक्षेपाच्या अनुषंगाने काही माहिती असेल, अशा व्यक्ती, तक्रारदार हे त्यांचेकडील कागदपत्रांसह विशेष तपास पथकास ७ व ८ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेस चंद्रपूर विश्राम गृह येथे भेटू शकतात, असे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले आहे. तपासाच्या अनुषंगाने विशेष तपास पथकाचे अध्यक्ष संदिप दिवाण चंद्रपूर विश्रामगृह येथे येत आहेत.