‘पालिका व प्रन्यासमधील अनेक अधिकाऱ्यांना लक्ष्मीदर्शनाशिवाय काम न करण्याची सवयच जडली आहे. अशांच्या छातीवर बसून रगडा व कामे करून घ्या किंवा आपल्याकडे तक्रारी करा, त्यांना उभ्याने ठोकून काढू’ हे विधान कोणत्याही स्थानिक नेत्याचे नाही, तर भक्कम जनसमर्थन लाभलेल्या केंद्रीय मंत्र्यांचे आहे. उपराजधानीचे खासदार व केंद्रात मंत्री असलेले नितीनभाऊ गडकरी हे अघळपघळ बोलण्यासाठी ज्ञात आहेत. खास वऱ्हाडी शैलीतील त्यांचे हे बोलणे सामान्य जनतेला अनेकदा आवडून जाते. म्हणून गडकरी जाहीरपणे असे बोलतात का?, हा अनेकांना पडलेला प्रश्न. सामान्य जनता भ्रष्टाचाराने नेहमीच त्रस्त असते. त्यामुळे या मुद्यावर एखादा बडा नेता बोलायला लागला की, जनतेला वाटते हा आपल्या मनातीलच बोलत आहे. लोकांची मने जिंकण्यासाठी अशी भाषा व वाक्ये कामी येतात. नेमका हाच हेतू तर गडकरींच्या या विधानामागे नसेल ना, अशी शंका घ्यायला भरपूर जागा आहे. मात्र, गडकरींच्या या विधानाचे विश्लेषण सामान्य जनता करीत नाही. ते त्यांचे कामही नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गडकरींची ही विधाने अनेक प्रश्न उपस्थित करतात. त्यातील बऱ्याच प्रश्नांचा रोख त्यांच्याकडेच जातो. पालिका व प्रन्यासवर गडकरींच्याच पक्षाची हुकूमत आहे. त्यांचेच खास समर्थक या दोन्ही ठिकाणी सत्तेच्या खुर्चीत विराजमान झाले आहेत. या समर्थकांना अधिकाऱ्यांकडून होणारी ही लक्ष्मीदर्शनाची मागणी दिसत नसेल काय?, नागरिकांना नाडवले जात असताना गडकरींचे हे समर्थक नेमके करतात काय?, या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याची जबाबदारी या सत्ता भोगणाऱ्या समर्थकांची नाही काय?, जर असेल आणि त्यात ते अपयशी ठरत असतील तर गडकरींनी जाब कुणाला विचारायला हवा?, गल्लीपासून दिल्लीपर्यंत निरंकुश सत्ता हाती असूनही अधिकारी पैसे खात असतील, लोकांना त्रास देत असतील तर हे राज्यकर्त्यांचे अपयश नाही का?, या अपयशाचा जाब गडकरी कुणाला विचारणार? शेवटी लोकांना स्वच्छ व चांगले प्रशासन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची सुद्धा असते. हे गडकरींसारख्या मुरलेल्या नेत्याला ठाऊक नाही, असे कसे समजायचे? चांगल्या प्रशासनासाठी चांगले अधिकारी उपलब्ध करून देणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी असते. अमूक एक अधिकारी हवा, असा आग्रह म्हणूनच सारे नेते धरत असतात. गडकरीही त्यात आले.

आता त्यांच्या विधानाचे सखोल विश्लेषण करायचे म्हटले, तर पालिका व प्रन्यासमधील अधिकारी चांगले नाहीत, म्हणूनच लोकांना त्रास होत आहे, असा अर्थ निघतो. म्हणजे, एकीकडे अधिकारीही आपणच आयात करायचे व दुसरीकडे त्यांच्यावरच अविश्वास व्यक्त करायचा, हा दुटप्पीपणा झाला. तो कशासाठी केला जात आहे?, या प्रश्नाचे उत्तर ही नेतेमंडळी देतील काय? सामान्य नागरिक लक्ष्मीदर्शनाच्या तक्रारी करत असतील, तर अशा किती अधिकाऱ्यांवर आतापर्यंत गडकरी समर्थकांनी कारवाई केली?, कुणाला निलंबित केले का?, कुणावरही कारवाई करायची नाही आणि टाळ्या मिळवण्यासाठी जाहीरपणे झोडून काढण्याची भाषा करायची, हा प्रकार योग्य नाहीच. उलट, सत्ताधाऱ्यांचे अपयश ध्वनित करणारा आहे. गडकरी कामाला वाघ आहेत. नवनव्या कल्पनेत रमणारा हा नेता विकासाच्या मुद्यावर तळमळीने झटणारा आहे, यात वाद नाही. वेगाने कामे व्हावीत, ती होत नाही म्हणून गडकरी अनेकदा चिडतात. त्यांचे हे चिडणे अनेक ठिकाणी रास्तही असते. मात्र, लक्ष्मीच्या मागे धावणाऱ्या एकदोघांवर कारवाई करून दाखवल्यावर गडकरींनी असे विधान केले असते, तर ते समजून घेता आले असते. तसे न करता सरसकट साऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून टाळ्या मिळवणे, हा प्रकार योग्य नाही व अशा बोलण्याने प्रशासनातील भ्रष्टाचारही थांबत नाही. प्रशासनात सर्व प्रकारचे लोक असतात. त्यातील चांगल्यांना जवळ करून कामे करवून घेणे हाच यावरचा तात्पुरता उपाय आहे. यावर अंतिम उपाय गडकरींना हवा असेल तर त्यांनी केंद्रात धूळखात पडलेले प्रशासकीय सुधारणांचे अनेक अहवाल पटलावर आणावे. तशी सुधारणा झाली तरच लक्ष्मीदर्शनाच्या रोगातून प्रशासन मुक्त होईल. असे खोलवर न जाता वरवरची भाषा बोलून केवळ काही काळ लोकांना जिंकता येते, दीर्घकाळ नाही, हे गडकरींना कोण सांगणार?

निवडणुका जवळ आल्या की, गडकरींच्या तोंडून लक्ष्मीदर्शन हा शब्द हमखास बाहेर पडायला लागतो. विरोधकांसाठी हा शब्द वापरण्यामागे एक निश्चित राजकीय गणित आहे व ते कोणते, हे गडकरींना ठाऊक आहे. राजकारणात अशी गणिते जुळवावी लागतात. त्यामुळे गडकरी ते करत असतील, तर त्यात गैर काही नाही. मात्र, अशाने लोकांना होणारा त्रास कमी होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे व त्याचे उत्तर नाही, असेच आहे. हे वारंवार होणारे त्रास समूळ नष्ट करण्यासाठी गडकरींनी मनापासून प्रयत्न केले, तर सामान्य जनता कायम त्यांच्या पाठिशी राहील. हे करण्यासाठी गडकरींना आधी आपल्या सत्ताधारी समर्थकांचाच वर्ग घ्यावा लागेल. भ्रष्टाचार निपटून काढताना हा आपला, तो परका, अशा भेदापासून स्वत:ला दूर ठेवावे लागेल. पालिका व प्रन्यासमध्ये बसलेले सर्व पदाधिकारी लक्ष्मीदर्शनापासून मुक्त आहेत, अशी ग्वाही जनतेला द्यावी लागेल. यासाठी आवश्यक असलेली झाडाझडती परिवारातूनच सुरू करावी लागेल. घर स्वच्छ झाले की, मग परिसर आपसूकच स्वच्छ होतो, या सूत्राचा अवलंब करावा लागेल. अशी तयारी गडकरी दाखवतील काय? मागे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रशासन ऐकत नाही, असे विधान करून राजकीय अपरिपक्वतेचा परिचय दिला होता. गडकरींच्या आताच्या विधानातून नेमके तेच अप्रत्यक्षपणे सूचित होते. एकीकडे सत्ता सांभाळायची व दुसरीकडे सत्ता व जनतेत दुवा असलेल्या प्रशासनालाच जाहीरपणे झोडपायचे, हा प्रकार योग्य नाही. उद्या एखाद्या सामान्याने मग तुम्ही काय करता?, तुम्ही प्रशासनाला वठणीवर का आणत नाही?, असे विचारले तर हे नेते नेमके कोणते उत्तर देणार?, याही प्रश्नाचा विचार यानिमित्ताने होणे गरजेचे आहे.

देवेंद्र गावंडे -devendra.gawande@expressindia.com