नागपूर : देशभरात केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक मोठ्या मंदिरात भ्रष्टाचार होत असल्यामुळे या मंदिराची चौकशी करण्यापेक्षा सरकारने ती भक्ताकडे सोपवावी, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समवन्वयक सुनील घनवट यांनी केली. राज्यातील वक्फ बोर्डाच्या अखत्यारित असलेल्या जमिनी सरकारने ताब्यात घ्याव्या, अशी मागणी त्यांनी केली.
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ४ फेब्रुवारीला रामनगरातील श्रीराम मंदिराच्या सभागृहात महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्रातील विविध मोठ्या मंदिराचे विश्वस्त सहभागी होणार आहेत. या अधिवेशनाच्या निमित्ताने सुनील घनवट नागपुरात आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात तृतीयपंथींची गुंडागर्दी !
हिंदूना आध्यात्मिक बळ देणारी भारतीय मंदिर आणि संस्कृती सेक्युलर शासनामुळे धोक्यात आली आहे. मंदिरातील पैसा धर्मकार्य व्यतिरिक्त इतरत्र वापरला जात आहे. सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या मंदिरात भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे सरकारने मंदिराचे व्यवस्थापन भक्तांच्या स्वाधीन करावे. त्यासाठी मंदिर संबंधित असलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांची निवड करावी. त्यात कुठल्याही राजकीय नेत्यांचा समावेश करु नये, असेही घनवटे म्हणाले.
मंदिराच्या अनेक जागेवर वक्फ बोर्डाने ताबा घेतला आहे. या सर्व जमिनी सरकारने आपल्या ताब्यात घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. आतापर्यंत मंदिराचे संघटन नव्हते मात्र आता राज्यातील साडेतीन हजार मंदिरांचे संघटन तयार झाले असून मंदिरावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सर्व एकत्र येत असतात. राज्यातील ४१४ मंदिरांत वस्त्र संहिता लागू करण्यात आली असून त्यात विदर्भातील १४० मंदिरांचा समावेश आहे. देशभरात मंदिरातील वस्त्रसंहिता लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. मंदिराच्या परिसरात २ किमी दूर मांस किंवा मद्याची दुकाने नसावी. असेल तर ती हटवण्याबाबत सरकारला निवेदन देण्यात आले आहे. समितीने काही मंदिरात आंदोलन केले असून त्याला प्रतिसाद मिळाला आहे.
हेही वाचा – वर्धा : १३ शेतकऱ्यांचा बळी जावूनही पुनर्वसन नाहीच
४ फेब्रुवारीला होणाऱ्या न्यास अधिवेशनात २५० हून निमंत्रित मंदिरांचे विश्वस्त प्रतिनिधी, पुरोहित व मंदिराच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते अभ्यासात सहभागी होणार आहेत. दिवसभर होणाऱ्या अधिवेशनात मंदिरासंबंधी विविध विषयांवर चर्चासत्र आणि काही प्रमुख लोकांचे मागदर्शन होणार असल्याचे घनवट यांनी सांगितले.