क्रीडा प्रबोधनीतील प्रकार
विदर्भातील पाचही क्रीडा प्रबोधिनीतील विविध पदांना मान्यता नसताना नागपुरातील प्रबोधिनीत रोजंदारीवर कर्मचारी नियुक्ती करून त्यांच्या मानधनावर लाखो रुपये खर्च झाले आहेत. यामुळे क्रीडा प्रोबोधिनीत सर्व काही आलबेल नसल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे.
प्रबोधिनीतील प्राचार्यपद वगळण्यास इतर पदांवर मानधनावर कर्मचारी नियुक्त केल्या जातात. या कर्मचाऱ्यांची निवड चार सदस्यीय समितीद्वारे करण्यात येते. गेल्या तीन वर्षांपासून कर्मचारी निवड समिती नागपुरात आली नाही. त्यामुळे मानधनावर कर्मचारी नियुक्तीचा प्रश्नच येत नाही. ज्या कर्मचाऱ्यांना त्याआधी नियुक्ती देण्यात आली. त्यांना दर सहा महिन्यांनी मुदतवाढ देण्यात येत आहे. शिवाय क्रीडा प्रबोधिनीचे तत्कालीन सहसंचालक विजय संतान यांनी तीन कर्मचाऱ्यांना रोजंदारीवर नियुक्त केले. देवानंद अवताडे (वसतिगृह प्रमुख), पंकज अंबुले (लिपीक) आणि भालचंद्र पालेकर (वाहन चालक) यांना २०१३ ते २०१५ कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात क्रीडा प्रबोधिनी, नागपूर येथे रोजंदारीवर नियुक्ती देण्यात आली. वसतिगृह प्रमुख आणि लिपीक यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि वाहनचालकास नऊ हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले.
क्रीडा प्रबोधिनी, बालेवाडी (पुणे) येथून या पदांना मान्यता देण्यात आली नाही. मात्र, या सर्व कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात आले. नियमित मानधन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी मुदतवाढ देण्याचा नियम आहे. मात्र, रोजंदारी कर्मचाऱ्यांना सलग दोन वर्षांसाठी नियुक्त करण्यात आले. या कर्मचाऱ्यांकडून कामे करवून त्यांना मानधन देण्यात आले. याशिवाय मानधन निश्चित असताना वाहनचालकाला २२ ऑक्टोबर २०१३ ला ३० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ३८ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला, असा तपशील माहिती अधिकार कायद्यांर्तगत प्राप्त झाला आहे. तसेच प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या रकमेचे धनादेश त्यांना देण्यात आले. अशाच प्रकारे इतर रोजंगारी कर्मचाऱ्यांना रक्कम देण्यात आली. तीन वर्षांपासून त्या पदांना मान्यता नसेल तर प्रबोधिनीने रोजंदारी कर्मचाऱ्यांना रक्कम कशी दिली? वेतनापेक्षा अधिक रकमेचे धनादेश कशासाठी दिले जात आहेत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी आणि तत्कालीन सहसंचालक विजय संतान म्हणाले, प्रबोधिनीतील सर्व पदे मानधनावर आहेत. समितीद्वारे ही पदे भरण्यात येतात. गेल्या तीन वर्षांपासून ही समिती आली नाही. येथील कोणत्याही पदाला मान्यता नाही. यासंदर्भात मंत्रालयात पत्रव्यवहार झाला आहे. आता ही पदे केंद्रीय पद्धतीने परीक्षा घेऊन भरण्यात येणार आहेत. परंतु कामे अडून राहू नये म्हणून तात्पुरती नियुक्तीचा पर्याय शोधण्यात आला. वाहनचालक भालचंद्र पालेकर हे यवतमाळ क्रीडा प्रबोधिनीमध्ये कार्यरत होते. तेथे त्यांना मानधन दिले जात नव्हते आणि नागपूर क्रीडा प्रबोनिधीत वाहन चालकाची आवश्यक होती. त्यामुळे ते नागपुरात आले.

‘पदांना मान्यता नसलीतरी अशा कर्मचाऱ्यांना मानधन देता येते. त्यासाठी दीड वर्षे निधी देखील मिळाला होता. संचालकांनी या कर्मचाऱ्यांना मानधन देऊ नये, असा आदेश काढला. त्यानंतर ते बंद करण्यात आले, तरीदेखील हे कर्मचारी अजूनही येथे कार्यरत आहेत.’
– विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी, नागपूर</p>

Story img Loader