लोकसत्ता टीम
वाशीम: शहरातील कचरा संकलीत करण्यासाठी नगर पालिकेने दीड कोटी रुपये खर्चून १७ घंटागाड्यांची खरेदी केली. कचरा संकलन सुरळीत सुरू असताना जवळच्या व्यक्तीला कचरा संकलन करण्याचा कंत्राट मिळावा यासाठी काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घंटागाड्या नादुरुस्त दाखवून कचरा संकलन करण्याचे कंत्राट एका खासगी व्यक्तीला देऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक राम पाटील डोरले यांनी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक यांच्याकडे केली आहे. वेळीच कारवाई न केल्यास महाराष्ट्र दिनी आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आम आदमी पार्टीच्यावतीने विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आले की, नगरपरिषदकडून ३ डिसेंबर २०२० रोजी १,४४,५०,०० रुपयांच्या १७ घंटागाड्याची खरेदी केली. त्या गाड्या सुव्यवस्थित कचरा संकलीत करीत असताना १६ महिन्यातच त्या घंटागाड्या नादुरुस्त दाखवून सर्व घंटागाड्यांची १५ वर्षांची फिटनेस मुदत असताना देखील नगरपरिषदने भंगारात काढून आवारात जमा केल्या. त्यानंतर २१ जुलै २०२२ रोजी ७८,९३,१०० रुपयाच्या नवीन घंटागाड्या कारण नसताना खरेदी केल्या.
आणखी वाचा- कोवळा प्रेमांकुर! अल्पवयीन बाला झाली माता म्हणून अल्पवयीन प्रियकर ताब्यात
त्याआधी आरोग्य विभागाकडून अल्पमुदतीची ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलीत करण्यासाठी २ जुलै २०२२ ते ७ जुलै २०२२ पर्यंत ऑफलाइन निविदा प्रक्रिया राबवून नगरपरिषदचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक मोरे यांच्या जवळचे कंत्राटदार सुरेश कदम यांना ७ जुलै २०२२ ला काम देण्यात आले. कचरा संकलन करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असून या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींना निलंबित करावे, अन्यथा महाराष्ट्र दिनी आत्मदहन करू, असा इशारा डोरले यांनी दिला आहे.