लोकसत्ता टीम

नागपूर : गांधीसागर तलावाचे (शुक्रवारी तलाव) सौंदर्यीकरण १० वर्षांपासून सुरू आहे. त्यावर कोट्यवधी रुपये देखील खर्च झाले आहे. परंतु अद्यापही २० टक्के देखील काम झालेला नाही. या कामावर झालेला कोट्यवधी रुपये गेला कुठे, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजीत पवार) बुधवारी तलावासमोर निदर्शन केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महालातील घरापासून काही अंतरावर हे तलाव आहे.

गांधीसागर तालावासमोर महिला शहराध्यक्ष सुनीता येरणे यांच्या उपस्थितीत मध्य नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवी पराते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. गांधीसागर तलाव नागपूर महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि निष्क्रियतेमुळेच ४९ कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून मेसर्स ध्रृव कन्सल्टन्सी कंपनीला कंत्राटदार कंपनी काढून काम पूर्ण करून घ्यायची जबाबदारी दिली होती आणि या कंपनीला वेळेत काम पूर्ण करून घ्यायचे होते, परंतु कन्सल्टन्सी कंपनीशी साटेलोटे करून मोठा भ्रष्टाचार केला गेला आहे. प्रशासन जाणिपूर्वक काम संथगतीने करून निधी वाढवण्याचा षड्यंत्र करत आहेत. तलावाच्या काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.

महापालिकेने याबाबत येत्या आठवडाभरात खुलासा करावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेसमोर उपोषण आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात रमण ठवकर, संदीप सावरकर, सुखदेव वंजारी, अमरीश ढोरे, कपिल मेश्राम, राहुल कामळे, रवींद्र वाट, सुशांत पाली, भारती गायधने, रेखा चरडे, शोभा येवले, शेखर बेंडेकर, संगीता अंमबारे, किरण नंदनवार, कनिजा बेगम, पुष्पम धानोरकर, ज्योती कावरे, तुषार दभाले, सलाम शेख, अभिनव फटींग, अंजुम शेख, मनोज जरेल,वाळबुधे गुरुजी, राहुल आमदरे, मिलिंद जगताफ आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

२० टक्के कामावर ८० टक्के खर्च

शुक्रवारी तलावाच्या सौदर्यीकरणाचे काम २०१९ पासून सुरू आहे. त्यासाठी बेलापूर, मुंबई येथील मेसर्स ध्रुव कन्सलटन्सी या कंपनीला सल्लागार नेमवण्यात आले. त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. आतापर्यंत प्रकल्पासाठी मंजूर निधी ८० टक्के खर्च झाला आहे. परंतु २० टक्के देखील काम पूर्ण झाले नाही. महापालिका प्रशासनच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले असून यात गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला.