महेश बोकडे

नागपूर :  राज्य शासनाच्या अखत्यारितील देशातील पहिले ‘रोबोटिक सर्जरी युनिट’  नागपुरातील मेडिकल रुग्णालयात आहे. या युनिटसाठी तीन वर्षांपूर्वी निधी मिळाला. परंतु खरेदी प्रक्रियेला खूप विलंब झाल्याने हे युनिट सुरू होण्यापूर्वीच त्याचा खर्च तब्बल तीन कोटींनी वाढला आहे. देशात सध्या दिल्ली एम्स या स्वायत्त संस्थेसह केंद्र सरकारच्या पीजीआय चंदीगड, एसजीपीजीआय, लखनौ या वैद्यकीय संस्थेत रोबोटिक सर्जरी युनिट आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी नागपूरचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेत नागपुरातील मेडिकलमध्ये हे युनिट तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी खनिकर्म महामंडळाकडून १६.८० कोटींचा निधी मिळाला.

हा राज्य शासनाच्या अखत्यारितील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील देशातील पहिला प्रकल्प राहणार होता. दरम्यान, राज्य शासनाने सगळय़ा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील खरेदी प्रक्रिया हाफकीन संस्थेकडून करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हा निधी हाफकीनकडे वळता झाला. परंतु विविध कारणांनी तब्बल तीन वर्षे या यंत्राची खरेदी प्रक्रियाच झाली नाही. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाच्या सूचनेवरून पुन्हा खरेदी प्रक्रियेला गती आली. सध्या या निविदेत तीन कंत्राटदार  असून यापैकी एक कंत्राटदार पात्र ठरला.

परंतु या कंत्राटदाराकडून निश्चित निकषानुसार हे यंत्र सुमारे २० कोटीत देण्याची तयारी दर्शवली गेली. त्यामुळे पूर्वीच्या १६.८० कोटींच्या तुलनेत हा खर्च तीन कोटी २० लाखांनी वाढलेला दिसत आहे. त्यामुळे पुन्हा  वाढीव निधीचा पेच उभा राहणार आहे.

रोबोटिक शस्त्रक्रियेचे फायदे काय?

रोबोटिक तंत्रामुळे शस्त्रक्रियेदरम्यान स्नायूंना जास्त इजा होत नाही, वेदना कमी होतात, कमी  रक्त वाया जाते. मानवाच्या तुलनेत यांत्रिक रोबोट हा शरीरात ३६० डिग्रीपर्यंत फिरतो. त्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीतेचे प्रमाण वाढते. यांत्रिकी पद्धतीने टाके लावण्याची प्रक्रिया सोपी होते.

हे युनिट नागपुरातील मेडिकलला लवकरच होईल. त्यासाठी  सगळय़ा राजकीय नेत्यांसह वैद्यकीय शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांची मदत मिळाली. प्रकल्पासाठी आवश्यक अतिरिक्त तीन कोटींचा निधी खनिकर्म महामंडळाकडून वाढवून देण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे.

– डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.