वर्धा : विविध रोगांचा प्रभाव मोठी हानी करणारा ठरतो. म्हणून त्याचे मूळ असलेल्या जंतूचा नायनाट करण्याचे संशोधन शासनाच्या पुढाकारात चालत असते. तसेच पिकांवरील रोगराई दूर व्हावी व भरघोस उत्पन्न मिळावे म्हणून शासन संशोधनास प्रोत्साहन देते. केंद्राच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्र लखनऊ येथील नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिटयूटने पण एका अळीवर संशोधन करीत रोगमुक्त कापूस वाण शोधून काढले आहे. कापसावर हिरवी बोण्डअळी होतीच. मग गुलाबी बोण्डअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी कमालीचे हैराण झाले होते.

आता तें चिंतामुक्त होण्याची चिन्हे आहेत. लखनऊ येथील या संस्थेच्या शास्त्रज्ञान्नी जगातील पहिला सुधारित म्हणजे जीएम कापूस विकसित केल्याचा दावा केला आहे. हा वाण भारत, आफ्रिका व आशियातील काही देशातल्या कापूस पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या विनाशकारी गुलाबी बोण्डअळीला पूर्णतः प्रतिरोध करणार. या अळीमुळे भारतात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ व पिक सरक्षणाचा ३० वर्षाचा अनुभव असलेले डॉ. पी. के. सिंग यांनी कीटकनाशक जनुक तयार केले आहे. हे स्वदेशी जनुक उच्च प्रतिकार क्षमतेचे आहे. तसेच ते कापसाच्या पानावरील कीड व आर्मीवॉर्म सारख्या अन्य कीटकपासून संरक्षण देणार.

संशोधित वाण तर आले. नंतर त्याच्या उत्पादनाची बाब पुढे आली. तेव्हा नागपूरस्थित अंकुर सिड्स या विख्यात कंपनीने सहकार्याचा हात पुढे केला. तंत्रज्ञान सुरक्षा सिद्ध झाली की बियाणे कंपन्यांना परवाना मिळणार. अंकुरने या संस्थेशी नुकताच करार केला. या आघाडीच्या बियाणे कंपनीचे विकास महाव्यवस्थापक डॉ. अश्विन काशीकर यांनी त्यावर मोहोर उमटविली. गुलाबी बोण्डअळीच्या धोक्यापासून कापसाचे रक्षण होणार. पिकाचे संरक्षण करण्याची जबाबदारी लखनऊ येथील संस्थेने घेतांनाच जागतिक स्तरावर कीटक प्रतिकारशक्तीसाठी एक नवा पायंडा निर्माण केला आहे, असे काशीकर म्हणतात. आमची कंपनी गत पाच दशकापासून शेतकऱ्यांना सेवा देत असून हे नवे कापूस वाण शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२००२ मध्ये भारतात जिएम कापूस तंत्रज्ञान आले. अमेरिकन कंपनीसोबत सहकार्य करीत बोलगार्ड कापूस जाती विकसित करण्यात आल्या. मात्र त्यामुळे गुलाबी बोण्डअळी पासून मजबूत संरक्षण मिळू शकले नाही, असे सांगण्यात येते.

Story img Loader