अकोला: खरीप हंगामातील पेरणीवर पाऊस लांबणीचा गंभीर परिणाम झाला आहे. आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर परिपक्व होणारे वाण वापरावे लागेल. याशिवाय इतर पिकांसाठीही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून आपात्कालीन पीक नियोजन शिफारसी करण्यात आल्या आहेत.
मोसमी पाऊस यंदा चांगलाच लांबला आहे. जून महिना संपत आला तरी दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. जिल्ह्यात एकूण चार लाख ६९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनचे दोन लाख ३२ हजार हेक्टर, कापूस एक लाख ६० हजार हेक्टर, तूर ५७ हजार ५०० हेक्टर, मूग १० हजार, उडीद सहा हजार, खरीप ज्वारी तीन हजार हेक्टरवर पेरणी होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी मशागत करून खरीप हंगामासाठी शेत तयार केले. त्यानंतर बी-बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची लगबग दिसून आली.
हेही वाचा… चंद्रपूर: चोरबिटी बियाण्यांची तस्करी करणाऱ्या तिघांवर गुन्हे
जून महिन्याच्या सुरुवातीला मोसमी पावसाचे आगमन होते. यावर्षी देखील वेळेवर मोसमी पावसाचे आगमन होईल, अशी बळीराजाला आशा होती. मात्र, जुलै महिना आला तरी अकोला जिल्ह्यात जोरदार मोसमी पावसाचे आगमन झाले नाही. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले. पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या आहेत.
हेही वाचा… यवतमाळ : पत्नीस जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप
पाऊस आगमन विलंबाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आपात्कालीन पीक नियोजनासंदर्भात शिफारसी शेतकऱ्यांसाठी जारी केल्या आहेत. या शिफारशीनुसार २ ते १५ जुलै दरम्यान पावसाचे आगमन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या कालावधीत कापूस पिकासाठी अमेरिकन तसेच देशी कपाशीचे लवकर परिपक्व होणारे वाण वापरावे. साधारणतः २० टक्के जादा बियाणे वापरावे. सुधारीत व संकरीत वाणांच्या बाबतीत दोन झाडांमधील अंतर कमी करावे. मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा आंतरपिक म्हणून आंतर्भाव करावा.
कापूस, ज्वारी, तूर, ज्वारी या त्रिस्तरीय आंतरपिक पद्धतीचा (सहाःएकःदोनःएक) अवलंब करावा. ज्वारी पिकासाठी संकरीत ज्वारीचा सी.एस.एच-९ किंवा सी.एस.एच-१४ वाण वापरावा. २० ते २५ टक्के जादा बियाणे पेरणी करावी. सोयाबीन पिकासाठी सोयाबीन टी.ए.एम.एस-३८, ती.ए.एमएस-९८-३१ किंवा जे.एस-३३५ या पैकी उपलब्ध वाण वापरावे. सोयाबीनच्या दोन, सहा किंवा नऊ ओळींनंतर तुरीची एक ओळ पेरावी. मूग, उडीद, तूर नेहमीप्रमाणे पेरणी करावी, अशा शिफारसी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी केल्या आहेत.
यंदा मोसमी पाऊस लांबणीवर पडला आहे. त्यामुळे चांगले पीक येण्यासाठी विद्यापीठाने केलेल्या या शिफारशींचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. – शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.