अमरावती : राज्यात भारतीय कापूस महामंडळामार्फत (सीसीआय) हमीदराने कापूस खरेदी सुरू असली, तरी ओलाव्याच्या प्रमाणानुसार दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत. कापसाचा हंगाम सुरू होऊन आता तीन महिने पूर्ण झालेले असताना बाजारात कापसाचे भाव शेतकऱ्यांना अपेक्षित असे नाहीत. दुसरीकडे ‘सीसीआय’ने दरात कपात केल्याने त्याचा परिणाम बाजारावर जाणवणार आहे.
कापसाचे या वर्षासाठी हमीभाव मध्यम धाग्यासाठी ७ हजार १२१ रुपये तर लांब धाग्यासाठी ७ हजार ५२१ रुपये प्रति क्विंटल आहेत. मंगळवारी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत ९५ क्विंटल कापसाची आवक झाली. कापसाला किमान ७ हजार २५० तर कमाल ७ हजार ५५० रुपये म्हणजे सरासरी ७ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
हेही वाचा…काय सांगता! शेगावात टक्कल पडण्याची साथ! अचानक केस गळती होऊन…
कापसात ओलाव्याचे प्रमाण कमी झाले असले तरी रूईचा उतारा कमी मिळत असल्याच्या कारणाखाली ‘सीसीआय’ने कापसाचे हमीदर शंभर रूपयांनी घटविले आहेत. ‘सीसीआय’च्या केंद्रांवर सध्या लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार ४२१ रूपये दर मिळत आहे. कापूस पणन महासंघ मोडीत निघाल्यानंतर आता सीसीआयमार्फत कापसाची खरेदी करण्यात येत आहे. हमीदराने कापसाची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यानी प्रांरभी खासगी बाजाराऐवजी ‘सीसीआय’ला प्राधान्य दिले. पहील्या वेचातील कापसाला ‘सीसीआय’ने हमीदर दिले. आता मात्र हे दर शंभर रूपयांनी कमी करण्यात आले आहेत. सध्या दुसऱ्या वेचातील (झडतीचा) कापूस बाजारात येत आहे. या कापसातील रूईचे प्रमाण पहील्या वेचातील प्रमाणापेक्षा कमी असल्याचे कारण देण्यात आले आहे.
हेही वाचा…ठाकूर बंधुंच्या निवासस्थानी ईडीचा छापा, ताडोबा ऑनलाइन बुकींग घोटाळ्यातील…
एक क्विंटल कापसातून सरासरी ३८ किलो रूई मिळत असल्याने व रूईचे दर बाजारात अधिक असल्याने ‘सीसीआय’ने पहील्या वेचातील लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार ५१२ रूपये तर, मध्यम धाग्याच्या कापसाला ७ हजार १२१ रूपये हा हमीदर दिला. दुसऱ्या वेचातील एक क्विंटल कापसातून ३४ ते ३५ किलो रूई निघत असल्याने प्रत कमी करत हमीदर शंभर रूपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे ‘सीसीआय’च्या केंद्रावर सध्या शेतकऱ्यांना प्रतीक्विंटल ७ हजार ४२१ रूपये दर मिळू लागला आहे. ‘सीसीआय’ने दर कमी करताच शेतकऱ्यांचा मोर्चा खासगी बाजाराकडे वळू लागला आहे. खासगी बाजारात सध्या हमीदराने खरेदी होऊ लागली आहे. पण, आवक वाढल्यास दर कमी होण्याची शक्यता आहे.